शिक्षकांनी केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता समाज जागृती करण्याची गरज; एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत यांचे प्रतिपादन

फलटण नगर परिषदेच्या वतीने शैक्षणिक प्रबोधन मेळावा उत्साहात; शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत आणि आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

। लोकजागर वृत्त । फलटण । १२ सप्टेंबर २०२६ ।

आर्थिक विषमता आणि शिक्षणाचा वाढता खर्च यामुळे समाजातील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान आहे. या आव्हानांना पेलण्यासाठी शिक्षकांनी यापुढे केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता याबाबत समाज जागृती करण्याची गरज आहे, असे मत एमकेसीएलचे संचालक तथा शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत यांनी व्यक्त केले. फलटण येथे प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्मशताब्दी आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून फलटण नगर परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या शैक्षणिक प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंत आणि आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी सावंत बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, श्री सद्गुरू उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले, पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, मसाप फलटण शाखेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती आणि विस्तार अधिकारी अनिल संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना सावंत म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये नवीन ज्ञानाची निर्मिती आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे असावे. विकसित देशांच्या तुलनेत आपल्याकडे शिक्षणापेक्षा पायाभूत सुविधांवर अधिक खर्च होत असल्याने शैक्षणिक सोयी-सुविधा आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी उत्कृष्ट शिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचे आव्हान आपल्यापुढे निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षकांनी वर्गाबाहेर पडून शिक्षणाच्या प्रश्नांबाबत समाजाला जागृत करण्याची भूमिका बजावावी. जग आणि काळ बदलला आहे; त्यामुळे शिक्षकांनी अध्यापनामध्ये आधुनिक उपक्रमांची रेलचेल आणून विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण अनुभव देण्याची गरज आहे. सध्या माहितीचा महापूर उपलब्ध आहे, मात्र आगामी काळात विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून विद्यार्थ्यांना अवघड किंवा चुकीच्या समजलेल्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून देण्याबरोबरच नवीन ज्ञानाची निर्मिती करण्यास शिकविले पाहिजे. याशिवाय उपक्रमाधारित शिक्षण आणि रचनावादाचा प्रभावी वापर करावा, असा सल्लाही त्यांनी शिक्षकांना दिला.

आमदार सचिन पाटील म्हणाले की, एआयच्या माध्यमातून विद्यार्थी पुढे जातील, मात्र त्यांना योग्य दिशा देऊन घडविण्याचे काम शिक्षकांचेच आहे. शिक्षकांच्या संस्कारातून विद्यार्थी आणि पर्यायाने सुसंस्कृत समाज घडतो. सर्वसामान्यांच्या मुलांनी अधिकारी व्हावे यासाठी शिक्षकांनी शिक्षणातील बदल आत्मसात करून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यावर भर द्यावा. प्रास्ताविकात रवींद्र बेडकिहाळ यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या नावाने पुढील वर्षापर्यंत फलटण शहरात अत्याधुनिक आणि राज्यासाठी आदर्श ठरेल असे वाचनालय उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रियदर्शनी भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर रूपाली सस्ते यांनी आभार मानले. या कार्यक्रमास तालुक्यातील शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love