दुधेबावी फेस्टिव्हलअंतर्गत राज्यस्तरीय सहकार रत्न पुरस्काराने दिलीपसिंह भोसले सन्मानित
। लोकजागर वृत्त । दुधेबावी (ता. फलटण) । २९ नोव्हेंबर २०२६ ।
ग्रामीण भागात विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात, मात्र गावाच्या भौतिक विकासासोबत समाजाची वैचारिक श्रीमंती वाढविण्याचे काम करणाऱ्या संस्था मोजक्याच असतात. दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानने संत गाडगेबाबा व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली २६ वर्षे ज्ञान, विचार आणि प्रबोधनाची अखंड परंपरा जपत ग्रामीण भागात वैचारिक चळवळीचा दीप प्रज्वलित ठेवला आहे. ही केवळ एका गावाची सांस्कृतिक परंपरा नसून समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी चळवळ आहे आणि प्रतिष्ठानचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून या विधायक कार्याला भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही फलटणचे माजी नगराध्यक्ष तथा फलटण फेस्टिव्हलचे संस्थापक दिलीपसिंह भोसले यांनी दिली. दुधेबावी (ता. फलटण) येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजित दुधेबावी फेस्टिव्हलअंतर्गत संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत पुण्याचे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांचे शुभहस्ते राज्यस्तरीय सहकार रत्न पुरस्कार दिलीपसिंह भोसले यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिनकरराव सोनवलकर, नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी बारामतीचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, बेलवंडीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनराव डांगे, तिरकवाडीचे माजी उपसरपंच महेश सोनवलकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दडस, संपतराव आडके आणि ग्रामपंचायत अधिकारी गणेश एकळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिलीपसिंह भोसले पुढे म्हणाले की, समाजाचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि भौतिक सुविधांच्या निर्मितीतून होत नाही, तर समाजाची वैचारिक जडणघडण होणेही तितकेच आवश्यक आहे. दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानने गावाच्या विकासासोबतच समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. एखादा उपक्रम सुरू करणे सोपे असते, परंतु त्यामागील उद्देश, सातत्य आणि सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवण्यासाठी मोठे समर्पण आवश्यक असते आणि प्रतिष्ठानने २६ वर्षांच्या प्रवासातून हे सिद्ध केले आहे. अशा उपक्रमांतून समाजमनावर होणारे संस्कार आणि नव्या पिढीमध्ये रुजणारे विचार हे कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा अधिक मोलाचे आहेत. संत गाडगेबाबा हे खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाचे चालते-बोलते विद्यापीठ होते, ज्यांनी केवळ भाषणातून उपदेश केला नाही तर स्वतःच्या कृतीतून समाजासमोर आदर्श निर्माण केला. स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन ही त्यांनी दिलेली मूल्ये आजही तितकीच महत्त्वपूर्ण आहेत. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केले तर त्यातून आत्मिक समाधान मिळते. अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाला मुक्त करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणे आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हाच गाडगेबाबांच्या विचारांचा खरा संदेश असून दुधेबावी प्रतिष्ठानने व्याख्यानमालेच्या माध्यमातून हाच विचारांचा वारसा जपला आहे. महाराष्ट्रात नावाजली जाणारी ही व्याख्यानमाला ग्रामीण भागातील वैचारिक चळवळीचे आदर्श उदाहरण ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर म्हणाले की, संत गाडगेबाबा व्याख्यानमालेमुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि युवकांना नामवंत व्याख्याते, अनुभवी प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळत आहे. यातून युवकांच्या विचारविश्वाला नवी दिशा मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत आहे. प्रतिष्ठान केवळ व्याख्यानमालेपुरते मर्यादित न राहता सर्वरोग निदान शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, एमपीएससी व यूपीएससी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिष्ठानचे हे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
कार्यक्रमाचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले, प्रास्ताविक व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष सागर कराडे यांनी केले, सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, सचिव विठ्ठल सोनवलकर आणि खजिनदार युवराज एकळ यांनी केले, तर सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी आभार मानले. यावेळी दुधेबावीचे माजी सरपंच भाऊसाहेब मोरे, उपसरपंच तानाजी नाळे, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार दादासाहेब पवार, सोसायटीचे चेअरमन सचिन सोनवलकर, सुमित नाळे, भानुदास सोनवलकर, फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय सोनवलकर, माजी उपसरपंच अविनाश चांगण, अण्णासाहेब भुंजे, सर्जेराव सोनवलकर, दुधेबावी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष भांड, क्रीडा समितीचे अध्यक्ष कांता सोनवलकर, भीमराव नाळे, पोपटराव सोनवलकर, उद्योजक राजेंद्र नाळे, किरण नाळे, वृक्षमित्र सचिन सोनवलकर, संदीप ठोंबरे, सौरभ एकळ आणि कृषिमित्र संजय सोनवलकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
