साताऱ्यासह सोलापूर व मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न; बाणगंगा नदीतून वर्षभर पाणी वाहते ठेवण्याची मागणी
। लोकजागर वृत्त । फलटण । २३ जुलै २०२६ ।
कुंभी, कासारी, कोयना आणि कृष्णा या नद्यांच्या पुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या प्रस्तावाच्या सर्वेक्षणासाठी २४ कोटी रुपयांचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याची माहिती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेच्या माध्यमातून सुमारे ५१ टीएमसी पाणी सातारा, सोलापूर आणि मराठवाड्याला उपलब्ध करून दिले जाऊ शकते. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पनेची दखल घेत त्याला अनुकुलता दर्शवली होती. त्यानुसार हा शासन निर्णय जारी करण्यात आला असून ही साताऱ्यासह सोलापूर आणि मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त दिलेले मोठे रिटर्न गिफ्ट आहे, असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणाचा अहवाल सकारात्मक आल्यास समुद्रात वाया जाणारे पुराचे पाणी दुष्काळी भागांकडे वळवणे शक्य होणार आहे. यामुळे भागातील कालवे १२ महिने वाहते ठेवण्याचा मुख्य प्रयत्न आहे. याच योजनेच्या माध्यमातून फलटण शहरातून वाहणाऱ्या बाणगंगा नदीतूनही वर्षभर पाणी वाहते ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हा सर्व्हे लवकरात लवकर पूर्ण झाल्यास परिसरातील कायमस्वरूपी दुष्काळ संपण्यास मोठी मदत होणार आहे. या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
