आरोग्याबाबत सतर्क राहणे ही काळाची गरज : डॉ. एम. एस. भोकरे

ऐश्वर्या हेल्थकेअर ट्रस्टच्या वतीने आयोजित मोफत थायरॉईड निदान शिबिराला रुग्णांचा मोठा प्रतिसाद.

। लोकजागर । फलटण । २३ मे २०२६ ।

“माणसाने आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या बाबतीत अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. सध्याच्या काळात थायरॉईडच्या समस्येमुळे शरीरात लठ्ठपणा येणे, चरबी वाढणे यांसारखे अनेक शारीरिक दोष उत्पन्न होऊ शकतात. भविष्यातील मोठे आजार टाळण्यासाठी नियमितपणे थायरॉईडची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांच्या मनातील थायरॉईडबद्दलच्या शंका आणि भीती दूर व्हावी, याच उद्देशाने ऐश्वर्या हेल्थकेअर ट्रस्टच्या वतीने या मोफत निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,” असे प्रतिपादन भोकरे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. एम. एस. भोकरे यांनी केले.

या शिबिराला रुग्णांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. पुढे बोलताना डॉ. भोकरे यांनी स्पष्ट केले की, ऐश्वर्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि भोकरे हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू व सर्वसामान्य रुग्णांवर पुढील आवश्यक ते सर्व उपचार योग्य पद्धतीने केले जातील, जेणेकरून रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळू शकेल. या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी आपली मोफत आरोग्य तपासणी करून घेतली.

हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. एम. एस. भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिता घोलप, विराज सूर्यवंशी, प्रियांका जगदाळे, ऋतुजा जाधव, मेघा भोसले, शुभांगी शिंदे आणि राजू जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Spread the love