। लोकजागर । सातारा । ५ मे २०२६ ।
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या द्वितीय वर्षाचे जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सातारच्या साहित्य क्षेत्राला संजीवनी देणाऱ्या या शाखेने गेल्या १५ वर्षांत अनेक उपक्रम राबवले असून, सातारा जिल्ह्यातील उत्तम साहित्यकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरू केली आहे. या पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, शाल आणि सन्मानचिन्ह असे असून, लवकरच एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते यांचे वितरण केले जाणार आहे.
यावर्षीचा मानाचा श्री. छ. थोरले प्रतापसिंह महाराज ज्येष्ठ साहित्यिक कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व. वा. बोधे यांना जाहीर झाला आहे. तसेच, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनचरित्रावर आणि साहित्यावर आधारित लिहिलेल्या ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘कर्तृत्त्वाचा एक शोध’’ या त्रिखंडात्मक चरित्राबद्दल ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांना विशेष साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
इतर पुरस्कारांमध्ये डॉ. पी. एन. शिंदे यांच्या ‘शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज’ या पुस्तकास बेबीताई कांबळे चरित्र पुरस्कार, तर सुभाष गुरव यांच्या ‘ठिणग्या’ कथासंग्रहास प्रा. अजित पाटील कथा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बा. सी. मर्ढेकर कविता पुरस्कार रामकली पावसकर यांच्या ‘नीरव किनाऱ्यावर’ या संग्रहास, वासंती मुजुमदार संकीर्ण साहित्य पुरस्कार ॲड. सीमंतीनी नुलकर यांच्या ‘फुलाचे जंगली प्रदेश’ या पुस्तकास आणि रा. ना. चव्हाण वैचारिक ग्रंथ पुरस्कार ॲड. शंकर निकम यांच्या ‘गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू’ या ग्रंथास प्रदान केला जाणार आहे. या निवडीची माहिती शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, उपाध्यक्ष विक्रम पाटील आणि कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
