शाळा समिती अध्यक्षा वसुंधरा नाईक निंबाळकर व उपाध्यक्ष नूतन अजितसिंह शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; भक्तीमय वातावरणात विठ्ठल नामाच्या गजराने परिसर दुमदुमला.
। लोकजागर वृत्त । फलटण । १६ जुलै २०२६ ।
विद्यार्थ्यांनी ज्ञानाची रचना साहित्याच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात अनुभवावी यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण येथे विविध प्रायोगिक ज्ञानरचनावादी साहित्याची मांडणी केलेल्या नूतन वर्गाचे उद्घाटन आणि भव्य विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:०५ ते दुपारी १२:१५ या वेळेत हा दुहेरी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या नूतन ज्ञानरचनावादी वर्गाचे अधिकृत उद्घाटन शाळा समितीच्या अध्यक्षा वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर आणि शाळा समितीच्या उपाध्यक्ष नूतन अजितसिंह शिंदे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या वेळी नियामक मंडळाचे (गव्हर्निंग कौन्सिल) सदस्य सी. डी. पाटील, निमंत्रित सदस्या निर्मला सतीश रणवरे आणि प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका गोसावी उपस्थित होत्या.
प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना हसत-खेळत आणि साहित्याच्या आधारे व्यावहारिक शिक्षण घेता यावे, या उद्देशाने या विशेष ज्ञानरचनावादी वर्गाची निर्मिती करण्यात आली आहे. उपस्थित मान्यवरांनी या वर्गाची पाहणी करून येथील नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याच्या मांडणीचे कौतुक केले, तसेच विद्यालयाच्या या प्रगत शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले. या वर्ग उद्घाटनासोबतच विद्यालयात भव्य विद्यार्थी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. आषाढी वारीचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात सहभाग घेतला. विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषाने आणि लहानग्या वैष्णवांच्या उत्साहाने संपूर्ण शाळा परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिताराणी कुमार कुचेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आयोजन करण्यात आले होते. या वैशिष्ट्यपूर्ण व भक्तीमय सोहळ्यास विद्यालयातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
