विविध सामाजिक संस्थांचा संयुक्त पुढाकार; घातक चायनीज मांजाबाबत दाखवली जाणार विशेष चित्रफित.
। लोकजागर वृत्त । फलटण । १४ ऑगस्ट २०२६ ।
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून फलटण तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिर, निसर्ग रक्षण व संवर्धन प्रभातफेरी तसेच चायनीज मांजा जनजागृती चित्रफित प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, १५ ऑगस्ट व रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ८:०० वाजेपर्यंत मुधोजी क्लब ग्राउंड, महात्मा फुले चौक, फलटण येथे रक्तदान शिबिर पार पडणार असून दिनांक १५ रोजी सकाळी ८:०० वाजता या महारक्तदान शिबिराचा सोहळापूर्वक शुभारंभ करण्यात येईल.
त्याचप्रमाणे रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता मुधोजी क्लब मैदान येथून निसर्ग जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. या वेळी पक्षी व पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या चायनीज मांजाबाबत जनजागृती करणारी विशेष चित्रफित दाखवली जाणार आहे.
सहयोग सोशल फाउंडेशन, रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण, नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी, क्रांतीसूर्य प्रतिष्ठान, महात्मा शिक्षण संस्था, निसर्ग रक्षण व संवर्धन संस्था, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने या विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे आणि प्रभातफेरीस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
