२१ वर्षे, १० महिने व ५ दिवसांच्या वयात मिळवला बहुमान; फलटण शहराच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा.
। लोकजागर वृत्त । फलटण । २२ ऑगस्ट २०२६ ।
फलटण नगरपरिषदेच्या कार्यक्षम नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद करत फलटण शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ (International Book of Records) च्या वतीने सिद्धाली शहा यांची ‘जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका’ (Youngest Municipal Corporator – Female) म्हणून अधिकृत नोंद घेतली असून, त्यांना या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र नुकतेच बहाल करण्यात आले आहे.
‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रानुसार, सिद्धाली अनुप शहा यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी हा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. या विक्रमाची नोंद होताना त्यांचे वय अवघे २१ वर्षे, १० महिने आणि ५ दिवस इतके होते. इतक्या लहान वयात नगरसेविका पदाची अत्यंत महत्त्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळत त्यांनी ही जागतिक पातळीवरील अद्वितीय कामगिरी करून दाखवली आहे.
सिद्धाली शहा या त्यांच्या प्रभागात आणि फलटण शहरात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या याच सक्रिय आणि धडाकेबाज कार्याला आता ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या माध्यमातून जागतिक ओळख मिळाली आहे.
सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून विश्वविक्रम प्रस्थापित केल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिद्धाली शहा यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल फलटणकरांमधून मोठा आनंद व्यक्त केला जात असून, त्यांच्या या विक्रमामुळे केवळ फलटणचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. शहरातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांना या विक्रमी यशाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
याबाबत बोलताना सिद्धाली शहा म्हणाल्या, “ही कामगिरी आमचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर व जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला व भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून फलटणच्या प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढवण्याची संधी दिली, तसेच मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्यामुळेच हे शक्य झाले आहे.”
