जोरदार घोषणाबाजी करत पत्रकारांनी नोंदवला संताप; तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी.
। लोकजागर वृत्त । फलटण । २७ जून २०२६ ।
पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात फलटण येथे भारतीय पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी फलटणमधील पत्रकारांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली आणि खासदार पाटील यांचा जाहीर निषेध नोंदवत घोषणाबाजी करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनानंतर भारतीय पत्रकार संघ, सातारा विभागाच्या वतीने फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांना अधिकृत निवेदन देण्यात आले. या निवेदनात खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा, जीवे मारण्याची जाहीर धमकी दिल्याचा आणि पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा अत्यंत गंभीर प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पत्रकारांनी नमूद केले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजात आणि जनतेपर्यंत सत्य माहिती पोहोचविण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य तो प्रामाणिकपणे करत असतो. अशा संवेदनशील परिस्थितीत एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांना थेट धमकावणे, त्यांच्यावर दडपशाही करणे व अपमानास्पद भाषा वापरणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वतंत्र पत्रकारिता आणि देशाच्या संविधानिक मूल्यांवर थेट आघात करणारे कृत्य आहे. अशा गंभीर घटनांकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर भविष्यात पत्रकारांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊन समाजात अत्यंत चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे भारतीय पत्रकार संघाने या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ आणि सखोल चौकशी करून, लागू असलेल्या कायद्यांनुसार खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने या निवेदनाची अधिकृत नोंद घेऊन त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती पत्रकार संघाला लेखी स्वरूपात द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या तीव्र निषेध आंदोलनाच्या वेळी भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीपकुमार जाधव, कार्याध्यक्ष राजाभाऊ बोन्द्रे, तालुकाध्यक्ष राजकुमार काकडे, विक्रम चोरमले, योगेश गंगतिरे, पोपटराव मिंड, गणेश भोईटे, सागर चव्हाण, प्रशांत सोनवणे, आप्पासाहेब तांबे, जुबेर कोतवाल, शेखर करचे, हिंदुराव गायकवाड, महादेव गायकवाड, अतुल मोरे, प्रमोद सस्ते आदी ज्येष्ठ पत्रकार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान “पत्रकारांवरील दडपशाही बंद करा”, “लोकशाहीचा चौथा स्तंभ अबाधित ठेवा” आणि “पत्रकारांना न्याय मिळालाच पाहिजे” अशा गगनभेदी घोषणांनी फलटणचा शासकीय परिसर पूर्णपणे दणाणून गेला होता. पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा लढा भविष्यात अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही भारतीय पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी प्रशासनाला दिला.
