२० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याचा डंका; सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा साताऱ्यात सत्कार संपन्न

साहिल जाधवचे दोन सुवर्ण, तर फलटणच्या कोळकीची सुकन्या ऋतुजा पिसाळ सुवर्णपदकाची मानकरी; साताऱ्यात निघाली भव्य विजयी रॅली

। लोकजागर वृत्त । सातारा । ५ ऑक्टोबर २०२६ ।

नागोया, जपान येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी ऐतिहासिक व अभूतपूर्व यश संपादन करून साताऱ्याच्या क्रीडा विश्वात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत साहिल जाधव याने आर्चरीतील कंपाऊंड क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण पदके पटकावली, फलटण तालुक्यातील कोळकी येथील ऋतुजा पिसाळ हिने भारतीय महिला हॉकी संघातून सुवर्ण पदक मिळवले, तर सुदेष्णा शिवणकर हिने ४×१०० मीटर रिले या मैदानी प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला आहे. या सर्व गुणवंत खेळाडूंचा, त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांचा तसेच पालकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने भव्य गौरव रॅली व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या गौरव समारंभात जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्यासह हजारोच्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. खेळाडूंची ही भव्य गौरव रॅली गांधी मैदान, राजवाडा ते श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा या मार्गावर अत्यंत धुमधडाक्यात काढण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेष्णा शिवणकर यांना सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात किमान एक तरी खेळ खेळला पाहिजे. तसेच खेळाडू व मार्गदर्शकांनी अशी यशाची संधी जिल्ह्याला वारंवार उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए.आय. सर्व काही करू शकते, परंतु ती खेळातील पदक मिळवून देऊ शकत नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाची आवड जपून त्याचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. साताऱ्यातील या भव्य सोहळ्याने संपूर्ण जिल्ह्यात क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love