श्रेया मानेची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

कमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थिनीचा सांगलीतील स्पर्धेत डंका; १४ वर्षांखालील गटात पटकावले द्वितीय स्थान.

। लोकजागर वृत्त । फलटण । ३ ऑक्टोबर २०२६ ।

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या वतीने आयोजित शासकीय शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत कमला निंबकर बालभवनची विद्यार्थिनी श्रेया प्रमोद माने हिने उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या चमकदार कामगिरीमुळे तिची राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली आहे.

स्पर्धेत श्रेयाने एकूण सहा फेऱ्यांमध्ये चार विजय आणि दोन बरोबरी मिळवत ५ गुणांची घसघशीत कमाई केली. विशेष म्हणजे पहिल्या तीन खेळाडूंनी प्रत्येकी ५ गुण मिळवल्याने अंतिम क्रमवारी निश्चित करण्यासाठी ‘बुकोल्झ टायब्रेकर’चा आधार घेण्यात आला, ज्यामध्ये श्रेयाने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. श्रेयाच्या या यशामध्ये तिचे वडील तथा कमला निंबकर बालभवनचे लेखापाल प्रमोद माने यांचा मोलाचा वाटा असून तिला क्रीडा शिक्षिका निता सस्ते यांचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्य क्रीडा अधिकारी किरण बोराडकर, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुहास पाटील, गव्हर्निंग सदस्य दीपक पाटील, सहाय्यक क्रीडा अधिकारी मोकाशी, आयोजक प्रवीण नंदगावे, शारीरिक शिक्षण संघटना सचिव सचिन हरोले तसेच सांगली बुद्धिबळ संघटना सचिव चंद्रकांत वळवडे यांचे सहकार्य लाभले. श्रेया मानेच्या या यशाबद्दल कमला निंबकर बालभवनच्या बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक व ‘आपली शाळा’ विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love