“योग साधना करून उत्कर्ष साधावा”

| लोकजागर|विशेष लेख | दिनांक २१ जून २०२६ |

२१ जून या दिवशी देशभरातील वातावरण योगमय झालेलं आपण पाहतो. परंतु नियमित योगासने करणाऱ्या भारतीयांची संख्या तशी अल्पच आहे. त्यामुळे ‘नव्याचे नऊ दिवस’ ही म्हण योगवीरांना लागू पडू नये! आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जी जय्यत तयारी केली जाते. तशी प्रतिदिन करणे शक्य होणार नाही. यासाठी योग आत्मसात झाल्यास ना देखाव्यांची आवश्यकता भासेल, ना योगाला ‘इव्हेंट’ स्वरूप द्यावे लागेल. सहस्रावधी रुपये भरून ‘जीम’ला जाणाऱ्या योग वीरांना धर्मशास्त्रयुक्त योग विद्येचा पर्याय एक दिवसापुरता ठीक वाटेल.पण अन्य दिवशी त्यांना तो बुरसटलेला वाटेल. तर हे अपयश कोणाचे? पैशाच्या खणखनाटा मागे लागलेल्या भारतीयांची योगाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

योग संकल्पनेला अध्यात्मिक पाया आहे. आरोग्यदायी निरामय जीवन जगण्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. योगामुळे आंतरिक शुद्धी होते. योगामध्ये प्राणायाम चा मोठा वाटा आहे. योगा हे मनावर खूप चांगले संस्कार करते. आपण सकारात्मक होतो. योगा ही एक आत्मसाक्षात्काराची अनुभूती आहे‌. योगाभ्यासातून स्वतःला निर्गुण अशा ईश्वराशी जोडता येते. योग विद्येचे पहिले गुरु हे शिव आहेत. त्यांना आदीयोगी किंवा आदीगुरू म्हटले जाते. योगाच्या माध्यमातून साधनेचे सामर्थ्य अनुभवावे आणि स्वतःचा उत्कर्ष ही साधावा हीच अपेक्षा!!

लेखन – श्रीमती वासंती लावंघरे, सातारा.

Spread the love