। लोकजागर । फलटण । दि. 5 जून 2025 ।
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा चार दिवसांच्या मुक्कामासाठी सातारा जिल्ह्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी फलटण पालखी तळाची पाहणी केली.या पालखी सोहळयात वारकर्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे असे जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी यावेळी सांगितले.

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा जिल्ह्यात लोणंद,तरडगाव,फलटण,बरड येथे मुक्कामी येत असून त्यातील फलटण येथील पालखी तळ आणि मार्ग यांची जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी पाहणी केली.त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव,मुख्याधिकरी निखिल मोरे,पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा,सुनिल महाडीक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावर्षीचा पालखी सोहळा स्वागत आणि प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सज्ज असून दीडशे अधिकारी आणि एक हजार कर्मचाऱ्यांच्या मदतीने पालखी तळ आणि मार्गावरील चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.भाविकांची तळांवरील माऊलींची दर्शनसेवा,तसेच सोहळयातील दिंडी आणि वाहनांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. पालखी मार्गावर ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे.त्या ठिकाणचे काम पूर्ण करण्यासंबंधी,तसेच अडचणीच्या ठिकाणी दुरुस्ती करून सपाटीकरण करण्यासंबंधीची चर्चा संबंधित विभागाशी झाली असल्याचेही जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी फलटण पालखी तळासंबंधीची सविस्तर माहिती तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव आणि मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख संतोष दोशी यांना दिली.
