सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी ‘कलम ३६’ लागू; शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना विशेष अधिकार!

गणेशोत्सव मिरवणुका, वाद्ये आणि मंडप परवानग्यांबाबत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे निर्देश; २९ सप्टेंबरपर्यंत अधिकार प्रदान.

। लोकजागर वृत्त । फलटण । ११ सप्टेंबर २०२६ ।

सातारा जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गणेशोत्सवादरम्यान मिरवणुकांचे मार्ग व वेळा निश्चित करणे, मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन, तसेच रस्ते व सार्वजनिक ठिकाणी गर्दी किंवा अडथळा निर्माण होऊ न देणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ नुसार विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाबाबत दिलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन व्हावे आणि ढोल-ताशे व इतर वाद्यांच्या आवाजावर नियंत्रण राहावे, यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत हे अधिकार बहाल केले आहेत.

या अधिकारानुसार आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी आवश्यक ते सर्व निर्देश देऊ शकणार आहेत. यामध्ये मोटार वाहनांचे नियमन करणे, कार्यक्रमासाठी ये-जा करणाऱ्या व्यक्तींच्या किंवा समुहाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि ध्वनीप्रदूषणाबाबतच्या नियमांची अंमलबजावणी करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, सार्वजनिक वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही अशा प्रकारे स्वागत कमानी, मंडप, विद्युत रोषणाई, कटआऊट्स आणि जाहिराती उभारण्यासाठी योग्य अटी व शर्तींवर परवानगी देण्याचे अधिकारही पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Spread the love