फलटणमधून घुमणार साहित्याचा हुंकार! प्राचार्य शिवाजीराव भोसले व बेबीताई कांबळे यांच्या निवासापासून आज निघणार ‘साहित्य प्रेरणा ज्योत’

। लोकजागर । फलटण । दि. १ जानेवारी २०२६ ।

साताऱ्याच्या ऐतिहासिक नगरीत आजपासून सुरू होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून, सातारा जिल्ह्यातील साहित्यिक वारसा उजळवून टाकणारा एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील दिवंगत थोर साहित्यिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी आज, गुरुवार दि. १ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता फलटण येथून ‘साहित्य प्रेरणा ज्योत’ काढली जाणार आहे.

ही प्रेरणा ज्योत थोर विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती बेबीताई कांबळे यांच्या निवासस्थानापासून प्रज्वलित केली जाईल. महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा, श्री सद्गुरु शिक्षण संस्था आणि महात्मा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ज्योतीचा शुभारंभ श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले आणि मसाप फलटण शाखेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. फलटणमधील सर्व साहित्यप्रेमींनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे

संमेलनाच्या इतिहासातील आगळावेगळा उपक्रम

साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘साहित्य प्रेरणा ज्योत’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यातून अशा प्रेरणा ज्योती निघणार असून त्या साताऱ्यातील ‘शिवतीर्थ’ येथे एकत्रित येतील.

मुख्य मंडपात होणार ‘साहित्य ज्योतीं’चे स्वागत

साताऱ्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या या प्रेरणा ज्योती आज दुपारी ३ वाजता शाहू स्टेडियमवरील संमेलन स्थळी पोहोचतील. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते या ज्योतींचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी असतील, तर स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या अभिनव उपक्रमामुळे साताऱ्याच्या भूमीतील साहित्यिकांच्या योगदानाला उजाळा मिळणार असून, संपूर्ण जिल्ह्यात सध्या साहित्याचा जागर आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love