‘फलटण नायक’चे संपादक मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना शासकीय अधिस्वीकृती पत्रिका प्रदान; ग्रामीण पत्रकारांना न्याय मिळाल्याने सर्वत्र कौतुक.
। लोकजागर। सातारा / फलटण । १७ जून २०२६ ।
“पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत नेहमी लोकहित जपावे, तसेच सत्य आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा अधिक बळकट करावी,” अशा शुभेच्छा महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री. हरिश पाटणे यांनी दिल्या. माझ्या कार्यकाळात जास्तीत जास्त ग्रामीण पत्रकारांना हक्काची शासकीय अधिस्वीकृती मिळवून देण्याचे भाग्य मला लाभत आहे. पत्रकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून निवडणुकीत जे बोललो, ते प्रत्यक्षात करून दाखवत असल्याचे मोठे समाधान आज मला मिळत आहे, असे भावनिक उद्गारही हरिश पाटणे यांनी काढले. सातारा येथील जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष आणि दिमाखदार समारंभात, फलटणमधील प्रसिद्ध ‘साप्ताहिक फलटण नायक’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत देण्यात येणारी अत्यंत प्रतिष्ठेची पत्रकार अधिस्वीकृती पत्रिका (Acredation Card) अध्यक्ष हरिश पाटणे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. त्याप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याप्रसंगी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सन्माननीय सदस्य चंद्रसेन जाधव व गोरख तावरे, सातारा जिल्हा माहिती कार्यालयाचे राहुल पवार, फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे, पत्रकार रोहित वाकडे, शेखर जगताप आणि अरुण जायकर यांच्यासह सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील अन्य पात्र पत्रकार अशोक इथापे (देगाव, वाई) आणि अरुण जायकर (वाघोली, कोरेगाव) यांनाही मान्यवरांच्या हस्ते अधिकृत अधिस्वीकृती पत्रिका प्रदान करण्यात आल्या. पुढे बोलताना हरिश पाटणे म्हणाले की, आमच्या कार्यकाळात शासनाच्या नियमानुसार विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल करणाऱ्या अनेक पात्र ग्रामीण पत्रकार व संपादकांना हे कार्ड मिळाले आहे. हे ॲक्रेडेशन कार्ड केवळ एक शासकीय ओळखपत्र नसून पत्रकाराची व्यावसायिक विश्वासार्हता, समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि नैतिक बांधिलकीचे ते एक सर्वोच्च प्रतीक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विभागीय व राज्य अधिस्वीकृती समितीचे उत्तम सहकार्य लाभत असल्यानेच जिल्ह्यातील सहकाऱ्यांना आम्ही न्याय देऊ शकलो आहोत.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून फलटणच्या सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे मितेश उर्फ काकासाहेब खराडे हे आपल्या साप्ताहिक फलटण नायक या वृत्तपत्राच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार, राजकीय तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम सातत्यपूर्वक करीत आहेत. ग्रामीण भागातील समस्या, जनतेच्या अडचणी आणि विकासात्मक विषय प्रभावीपणे मांडत त्यांनी पत्रकारितेमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून अधिस्वीकृती कार्ड प्रदान करण्यात आल्याने फलटण तालुक्यासह पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या सन्मानामुळे फलटण नायक परिवारासह वाचकवर्गामध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अधिक जबाबदारीने आणि सामाजिक भान जपत पत्रकारितेचे कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार काकासाहेब खराडे यांनी व्यक्त केला आहे.
