प्रभाग क्र. ८ मधील शेकडो महिलांची अक्कलकोट-पंढरपूर दर्शनयात्रा उत्साहात संपन्न

अनुप शहा व कु. सिद्धाली शहा यांच्या पुढाकाराने महिलांना लाभले सुखकर दर्शन

। लोकजागर । फलटण । २० जून २०२६ ।

फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील शेकडो महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेली अक्कलकोट व पंढरपूर येथील धार्मिक दर्शनयात्रा नुकतीच अत्यंत उत्साहात, शिस्तीत आणि भक्तीमय वातावरणात पार पडली. फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक अनुप शहा आणि प्रभाग ८ च्या लोकप्रिय, कार्यक्षम नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या विशेष पुढाकारातून आणि उत्तम नियोजनातून ही भव्य दर्शनयात्रा यशस्वीरीत्या संपन्न झाली. या यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात सहभागी झालेल्या बहुतांश महिला या अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील होत्या. यापैकी अनेक महिलांच्या आयुष्यात अक्कलकोटचे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराज आणि पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची ही पहिलीच वेळ होती. अनुप शहा आणि कु. सिद्धाली शहा यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळेच आपल्याला आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच या पवित्र तीर्थक्षेत्रांचे अतिशय दर्शन सुलभतेने आणि सुरक्षितपणे घेता आले, अशी भावूक व कृतज्ञतेची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली. आपल्या लाडक्या दैवतांचे दर्शन सुखकररीत्या घेता आल्यामुळे सर्व महिला भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आध्यात्मिक आनंद आणि समाधान ओसांडून वाहत होते.

हा अत्यंत लोकोपयोगी आणि धार्मिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी फलटणमधील वरिष्ठ नेत्यांचे खंबीर नेतृत्व व मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. सातारा जिल्ह्याचे माजी खासदार श्रीमंत रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमंत समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण यात्रेचे नियोजन चोख ठेवण्यात आले होते. प्रभागातील कष्टकरी महिला भगिनींना त्यांच्या दैनंदिन घरगुती कामांमधून थोडा विरंगुळा मिळावा, मनःशांती लाभावी आणि त्यांना भक्तीरसाचा आनंद घेता यावा, या उदात्त हेतूने शहा पिता-कन्येने (अनुप शहा व कु. सिद्धाली शहा) राबवलेल्या या उपक्रमाचे संपूर्ण फलटण शहरातून आणि विशेषतः प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांकडून मोठे कौतुक केले जात आहे. प्रवासादरम्यान निवास, भोजन आणि सुरक्षेची अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था केल्याबद्दल यात्रेत सहभागी शेकडो महिलांनी आयोजक अनुप शहा व नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांचे मनापासून जाहीर आभार मानले आहेत.

Spread the love