श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गुणवंतांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात संपन्न; १० वीतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला डांगे यांच्याकडून ट्रॉफी जाहीर.
। लोकजागर वृत्त । जिंती / फलटण । २१ जून २०२६ ।
“जीवनात कोणतेही उच्च ध्येय गाठायचे असेल, तर कठोर परिश्रमास दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यासाठी आपल्या अंगी तीव्र जिद्द, चिकाटी असणे आणि सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. चांगल्या कामाचे कौतुक केल्यामुळे प्रेरणा मिळते आणि ध्येय गाठण्याची जिद्द आपोआपच निर्माण होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या जिंती गावातील रयत शिक्षण संस्थेच्या या हायस्कूलमध्ये आपल्याला शिकायला मिळाले, हे आमचे परमभाग्य आहे,” असे भावोद्गार प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मोहनराव डांगे यांनी काढले. जिंती (ता. फलटण) येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुणवंतांच्या विशेष सत्कार समारंभ’ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे सदस्य श्री. राजेंद्र रणवरे हे होते, तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महादेवराव गुंजवटे, प्रकाश रणवरे, महादेव रणवरे, नवनाथ रणवरे, जगदेवराव रणवरे, मुख्याध्यापिका सौ. माधुरी जाधव आणि ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मोहनराव डांगे यांनी, विद्यार्थ्यांनी शालेय वयातच चांगला अभ्यास करून आपल्या जीवनाला योग्य आकार द्यावा आणि भविष्यात समाजासाठी दिशादर्शक ठरावे, असे सांगत यंदाच्या शैक्षणिक वर्षात १० वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास आपल्या वतीने विशेष ट्रॉफी भेट देण्याची घोषणा केली.
याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे श्री. महादेवराव गुंजवटे म्हणाले की, शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना घडवण्याचे पवित्र कार्य या विद्यालयात सुरू असून, येथील शिक्षक वर्ग त्यासाठी नेहमीच कार्यप्रवण असतो. त्यांनी विद्यार्थ्यांना आळस झटकून, सकारात्मक विचार करण्याचा, आरोग्य जपण्याचा आणि दररोज सूर्यनमस्कार, ध्यानधारणा व योगासने करून जीवनात चैतन्य निर्माण करण्याचा सल्ला दिला. तसेच स्वामी विवेकानंदांप्रमाणे आपले विचार आदर्श ठेवून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी रोज किमान एक पान वाचण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात स्कूल कमिटीचे सदस्य प्रकाश रणवरे यांनीही आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून झाली. याप्रसंगी विद्यालयाचे नवनियुक्त स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे आणि महादेव रणवरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता १० वीच्या परीक्षेत विद्यालयातून अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावणारे विद्यार्थी ओम रणवरे (याला महादेवराव गुंजवटे यांच्यातर्फे विशेष ट्रॉफी व भेटवस्तू), अर्णव रणवरे आणि कु. नम्रता वाघमारे यांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन जाहीर गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात ‘बालभारती’ पुणेच्या इयत्ता ६ वी ते ८ वी इतिहास विषय लेखन समितीचे सदस्य आणि समुपदेशक श्री. ताराचंद्र आवळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या कौतुकास्पद सोहळ्याचे प्रास्ताविक व स्वागत ताराचंद्र आवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना सोनवलकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सौ. माधुरी जाधव यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षिका सौ. विद्या जमदाडे, शाहीन हन्नूरे, अंकुश सोळंकी, जीवन देशमुख, अमोल जाधव, मधुकर जगताप आणि राजेंद्र घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सत्कार समारंभाला जिंती परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
