फलटण नगरपरिषदेत विषय समित्यांसाठी राजकीय रणधुमाळी; २६ फेब्रुवारीला विशेष सभेचा मुहूर्त

स्थायी समितीसह ७ समित्यांचे होणार गठण; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत रंगणार सत्तावाटपाचा पेच

। लोकजागर । फलटण । दि. १७ फेब्रुवारी २०२६ ।

फलटण नगरपरिषदेच्या राजकीय आखाड्यात आता ‘सत्तावाटपाची’ मोठी रणधुमाळी उडणार असून, विविध ७ विषय समित्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’च्या निवडीसाठी दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात होणारी ही बहुप्रतिक्षित सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या सभेची अधिकृत नोटीस जारी करण्यात आली असून, प्रतिष्ठेच्या समित्यांची सभापतीपदे मिळवण्यासाठी आता नगरसेवकांमध्ये जोरदार ‘लॉबिंग’ आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे.

नगरपरिषदेच्या नियमानुसार विषय समितीवरील सदस्यांची संख्या ७, तर स्थायी समितीची सदस्य संख्या ११ अशी निश्चित करण्यात आली आहे. या विशेष सभेमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम, शिक्षण-क्रीडा व सांस्कृतिक, स्वच्छता-वैद्यक आणि आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन व विकास, महिला व बालकल्याण आणि मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी अशा एकूण ७ समित्यांचे सदस्य व सभापती निवडले जाणार आहेत. या प्रक्रियेत नगराध्यक्ष हे ‘स्थायी समितीचे’ तर उपनगराध्यक्ष हे ‘शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे’ पदसिद्ध सभापती म्हणून काम पाहतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सभेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार २६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते ११.३० वाजेपर्यंत सदस्यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले जातील. त्यानंतर ११.३० ते १२.०० वाजेपर्यंत सभापती पदासाठी अर्ज स्वीकारले जातील. दुपारी १२.०० ते १२.१५ या वेळेत अर्ज माघारीची मुदत असेल आणि त्यानंतर तात्काळ समितीच्या रचनेची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. विशेष म्हणजे ‘महिला व बाल कल्याण समिती’च्या सभापती व उपसभापती पदी केवळ महिला सदस्यांचीच निवड केली जाणार असून, उर्वरित समित्यांच्या निवडीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

फलटण नगरपरिषदेच्या या सत्तेच्या चाब्या कुणाच्या हाती पडतात आणि आगामी काळातील विकासकामांचे नियोजन कोणत्या गटाच्या सभापतींकडे जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सर्व नगरसेवकांना या विशेष सभेसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या असून, प्रशासकीय स्तरावर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.


Spread the love