। लोकजागर । बारामती (पणदरे) । दि. १ मार्च २०२६ ।
महाराष्ट्राचे लाडके नेते आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाला काल २८ फेब्रुवारी रोजी एक महिना पूर्ण झाला. या प्रथम मास स्मृतीनिमित्त ‘साहित्य विचार मंच, सांगवी’ आणि ‘सुनेत्राजित प्रतिष्ठान, अहिल्यानगर (पणदरे)’ यांच्या वतीने पाच देशी वृक्षांचे रोपण करून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर ‘अजित वृक्षपर्व’ ही मोहीम राबवून दादांच्या स्मृती चिरंतन जपण्याचे आवाहन ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले आहे.
प्रा. कोकरे यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडताना सांगितले की, अजितदादांचे वृक्षांवरील आणि निसर्गावरील प्रेम सर्वश्रुत होते. त्यामुळेच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरमहा ५ वृक्ष आणि वर्षअखेरीस ६६ वृक्ष लावण्याचा संकल्प प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने करावा. शाळा, मंदिरे, क्रीडा मैदाने, स्मशानभूमी आणि रस्त्यांच्या दुतर्फा हे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी दादांचे समर्थक, कार्यकर्ते आणि ‘लाडक्या बहिणींनी’ घ्यावी. जागतिक तापमान वाढ आणि बदलत्या पर्यावरणाचा विचार करता, ही वृक्षलागवड काळाची गरज आहे.
“वृक्षवल्ली आम्हां सोयरे” या संत तुकोबांच्या उक्तीप्रमाणे दादांच्या आठवणींना हिरवाईच्या माध्यमातून जिवंत ठेवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ‘शुभस्य शीघ्रम’ या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईने आणि पदाधिकाऱ्यांनी या सामाजिक जाणीवेच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. साध्या पद्धतीने पण प्रभावीपणे राबवलेला हा उपक्रम निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास प्रा. कोकरे यांनी व्यक्त केला.
