स्वामी विवेकानंद नगर भागातील नागरिकांना मोठा दिलासा! ९३ गुंठे पडीक जागेचा होणार कायापालट : आमदार सचिन पाटील

। लोकजागर वृत्त । फलटण । २१ जून २०२६ ।

फलटण शहराच्या वैभवात, सौंदर्यात आणि पर्यावरणात मोलाची भर घालणारी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. फलटण शहरातील स्वामी विवेकानंद नगर भागात असलेल्या वन विभागाच्या तब्बल ९३ गुंठे पडीक जागेचा आता संपूर्ण कायापालट होणार असल्याची अधिकृत घोषणा आमदार सचिन पाटील यांनी केली आहे. गेली अनेक वर्षे या पडीक क्षेत्रामध्ये एक मोठा खड्डा पडला होता, ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली होती. यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून स्थानिक नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढत, आमदार सचिन पाटील यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विशेष समन्वय साधला असून, या पडीक ठिकाणी लवकरच एक देखणे व निसर्गरम्य ‘वनउद्यान’ (अर्बन फॉरेस्ट पार्क), मोठ्या प्रमाणावर घनदाट वृक्षारोपण, अत्याधुनिक वॉकिंग ट्रॅक आणि आरोग्यप्रेमींसाठी ‘ओपन जिम’ आदी गोष्टी साकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

स्वामी विवेकानंद नगर परिसराचा चेहरामोहरा बदलणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सातारा जिल्ह्याचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे व मोलाच्या मार्गदर्शनातून मार्गी लागत असल्याचे आमदार सचिन पाटील यांनी आवर्जून सांगितले. या विशेष प्रकल्पाच्या पाहणी व नियोजनाप्रसंगी अभिजीत नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक रणजितसिंह भोसले, राहुलभैय्या निंबाळकर, सचिन रणवरे, अरुण खरात आणि साईप्रसाद फुले यांच्यासह स्वामी विवेकानंद नगर परिसरातील आबालवृद्ध नागरिक, महिला भगिनी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा आरोग्याचा आणि पर्यावरणाचा प्रश्न निंबाळकर-पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सुटणार असल्याने, स्थानिक नागरिकांमधून आणि फलटणकरांमधून प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले जात आहेत.

Spread the love