आयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा फलटण येथे ‘कृतज्ञता गौरव मानपत्र’ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

शिक्षण क्षेत्रातील दीर्घ सेवेबद्दल समाज आणि धम्म चळवळीच्या वतीने कृतज्ञता; विपश्यना साधना व फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा पुढे नेण्याचा सत्कारमूर्तींचा संकल्प.

। लोकजागर । फलटण । १६ जून २०२६ ।

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याची माजी कार्यकारिणी व भारतीय बौद्ध महासभा परिवार (BBM Family) यांच्या संयुक्त वतीने शिक्षण क्षेत्रासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या दोन रत्नांचा गौरव करण्यात आला. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या आदरणीय आयुनि. छाया राजेंद्रकुमार गायकवाड मॅडम आणि आदरणीय आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे सर यांच्या दीर्घ सेवापूर्तीनिमित्त फलटण येथे ‘कृतज्ञता गौरव मानपत्र’ प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भावूक, कौटुंबिक आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी दोन्ही सत्कारमूर्तींना समाजप्रबोधन व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कृतज्ञता गौरव मानपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध पद्धतीने विधी संचालनाने झाली. याचे नेटके संचालन व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांनी केले. त्यांनी सत्कारमूर्तींच्या कुटुंबियांचे धम्म चळवळीतील योगदान अधोरेखित करत दोघांनाही उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. तर माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप सर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण अशा कृतज्ञता गौरव मानपत्राचे वाचन केले.

शिक्षणमहर्षींचे योगदान आणि धम्म चळवळीचा वारसा: याप्रसंगी बोलताना भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा सातारा व पुणे जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले यांनी केंद्र व राज्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “अनेक जण सेवानिवृत्तीनंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये मर्यादित राहतात; मात्र या दोन्ही सत्कारमूर्तींनी आपल्या उज्ज्वल शैक्षणिक कारकिर्दीसोबतच धम्मकार्यात सक्रिय योगदान दिले आहे. भविष्यातही ते फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा अधिक ताकदीने पुढे नेतील.”

सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी सांगितले की, “छाया गायकवाड मॅडम यांना त्यांचे वडील स्वर्गीय आर. टी. रणवरे यांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला असून त्या सामाजिक चळवळीत कायम सक्रिय राहिल्या आहेत. तसेच विठ्ठल निकाळजे सरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून तब्बल ३१ वर्षे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावली, शाळेचा भौतिक व शैक्षणिक दर्जा उंचावला.” माजी पदाधिकारी धम्ममित्र आयु. सतीश कांबळे यांनी सत्कारमूर्तींना पुढील आयुष्यात विपश्यना साधना करून आनंदी जीवन जगण्याचा सल्ला दिला, तर माजी संस्कार उपाध्यक्ष आयु. बजरंग गायकवाड यांनी संकटांचा सामना तथागत बुद्धांच्या धम्मविचारांच्या आधाराने करत जागतिक बौद्ध राष्ट्रांना भेटी देण्याचे आवाहन केले.

सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती झाल्या भावूक: गौरवाला उत्तर देताना आयु. विठ्ठल निकाळजे सर भारावून गेले, ते म्हणाले, “माझ्या ३१ वर्षांच्या प्रवासात पत्नी व मुलांची मोठी साथ लाभली. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा जगण्याची खरी प्रेरणा मला आयु. दादासाहेब भोसले यांच्याकडून मिळाली, ज्यामुळे आम्ही पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून धम्म चळवळीत आलो. येत्या काळात बौद्ध स्थळांना भेटी देणे, विपश्यना करणे आणि धम्म चळवळीत सक्रिय राहण्याचा माझा मनोदय आहे.”

आयुनि. छाया गायकवाड म्हणाल्या, “सर्वांनी इतक्या आपुलकीने व प्रेमाने आमच्या घरी येऊन केलेला हा सत्कार मनाला भावणारा आणि नवी ऊर्जा देणारा आहे. येणाऱ्या काळात आपल्या सर्वांच्या सोबतीने बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”

भीमशक्ती आणि धम्मबांधवांची मोठी उपस्थिती: या सोहळ्याप्रसंगी माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, माजी संघटक आयु. अमोल काकडे, माजी संघटक आयु. आनंद जगताप, संस्कार सचिव आयु. अमोल भोसले, धम्ममित्र विजयकुमार जगताप, ‘साप्ताहिक साम्राज्य नायक’चे संपादक प्रशांत सोनवणे, आयु. विकास गायकवाड (फौजी), माजी प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, माजी कायदेशीर सल्लागार ॲड. चंद्रशेखर मोरे, धम्ममित्र विजय निकाळजे उपस्थित होते. तसेच महिला आघाडीच्या प्रतिनिधी आयुनि. पारिजातका जगताप, आयुनि. साळूताई उर्फ भाग्यश्री निकाळजे, आयुनि. योगिता घोरपडे यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, धम्ममित्र, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love