कृतिशील शिक्षणातूनच बालकांचा सर्वांगीण विकास शक्य : वसुंधरा नाईक निंबाळकर

मुधोजी बालक मंदिरच्या ‘भव्य बालवाडी साहित्य प्रदर्शना’चे उत्साहात उद्घाटन

। लोकजागर । फलटण । दि. २ मार्च २०२६ ।

“शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बालपणातच विद्यार्थ्यांच्या मनातील संकल्पना स्पष्ट होणे अत्यंत गरजेचे असते. विविध शैक्षणिक साहित्याचा कृतिशील वापर केल्यास गणित, भाषा आणि सामान्य ज्ञान यांसारखे विषय बालकांच्या मनात कायमचे रुजतात,” असे प्रतिपादन मुधोजी बालक मंदिरच्या चेअरमन सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांनी केले. मुधोजी बालक मंदिर येथे आयोजित भव्य बालवाडी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर भारतीय पत्रकार संघ, साताराचे पदाधिकारी विकास शिंदे, राजकुमार काकडे, हिंदुराव गायकवाड, गणेश भोईटे, जुबेर कोतवाल, आप्पासाहेब तांबे, मुधोजी हायस्कूलचे मुख्याध्यापक रुपेश शिंदे आणि बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सुजाता रजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनात मांडलेल्या प्रत्येक साहित्यातून शिक्षणाची आधुनिक जोड दिसून येत असल्याचे गौरवोद्गार सौ. नाईक निंबाळकर यांनी काढले.

विकास शिंदे यांनी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “बालवाडीत शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयाची मांडणी अत्यंत आकर्षक पद्धतीने केली आहे. कृती आणि प्रात्यक्षिकाद्वारे दिले जाणारे हे शिक्षण बालकांच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरेल.” त्यांनी फलटणमधील सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन आवर्जून पहावे, असे आवाहनही केले. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले असून, परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे.

Spread the love