फलटणमध्ये सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न
। लोकजागर । फलटण । २ जून २०२६ ।
“माजी नगरसेवक सनी अहिवळे व नगरसेविका सुपर्णा अहिवळे यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अत्यंत कौतुकास्पद असून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम ते गेली दोन दशके निस्वार्थपणे करत आहेत. फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फलटण नगर परिषद शाळा नंबर २ च्या विकासासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता मी आमदार म्हणून कधीही भासू देणार नाही. भविष्यात फलटण शहर आणि तालुक्यातील मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन,” असे महत्त्वपूर्ण आश्वासन आमदार सचिन कांबळे पाटील यांनी दिले.
सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने आज मंगळवार, दिनांक २ जून २०२६ रोजी मंगळवार पेठेतील ‘बुद्ध बंगला’ येथे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून आमदार सचिन कांबळे पाटील बोलत होते.
या प्रसंगी फलटणचे नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजीत भोसले, विजय येवले, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका मीना जीवन काकडे, नगरसेवक सुदाम मांडरे, नगरसेविका सिधाली अनुप शहा आणि बी. टी. जगताप यांच्यासह शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर परिषद शाळांमध्ये काँम्प्युटरची सोय करणार: नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचा गौरव केला. “शिक्षणातूनच समाज परिवर्तन घडते, हे अहिवळे कुटुंबीयांनी आपल्या २२ वर्षांच्या अविरत कार्यातून सिद्ध केले आहे. आगामी काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून फलटणच्या नगर परिषद शाळांचा कायापालट केला जाईल. डिजिटल युगात येथील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, यासाठी शाळांमध्ये तातडीने कॉम्प्युटरची (संगणक) उत्तम सोय करण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
२२ वर्षांची अविरत सामाजिक बांधिलकी; ग्रामीण मुलांना मुख्य प्रवाहात आणणार: सनी अहिवळे माजी नगरसेवक सनी अहिवळे आणि नगरसेविका सुपर्णा अहिवळे यांनी गेली २२ वर्षे अविरतपणे सामाजिक बांधिलकीतून दरवर्षी हजारो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू, दप्तर, वह्या व पुस्तके देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आहे. सत्काराला उत्तर देताना सनी अहिवळे भावूक होत म्हणाले की, “बुद्ध निवासच्या दारात आलेल्या एकाही गरजू विद्यार्थ्याला आम्ही आजवर रिकाम्या हाताने पाठवले नाही. भविष्यातही ‘मिशन १०० डॉक्टर-इंजिनिअर’ सारखे उपक्रम राबवून ग्रामीण व वंचित भागातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
रोपटे देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश: कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहावी-बारावीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवपत्र, दप्तर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या विशेष उपक्रमांतर्गत सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांना शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
