पाऊस सुरू होताच संध्याकाळी ७ ते ९ ची वेळ भुंगेरे नष्ट करण्यासाठी महत्त्वाची; कृषी अधिकारी बांधावर जाऊन करत आहेत मार्गदर्शन.
। लोकजागर । फलटण / सासकल । १३ जून २०२६ ।
खरीप हंगाम २०२६-२०२७ च्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने विविध शेतकरीभिमुख मोहिमा युद्ध पातळीवर राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून फलटण तालुक्यातील सासकल येथे कृषी विभागामार्फत ‘हुमणी कीड भुंगेरे नियंत्रण’ अंतर्गत प्रकाश (लाईट) सापळा मोहीम अत्यंत यशस्वीरीत्या राबविण्यात आली. सासकल येथील प्रगतशील शेतकरी श्री. शिवाजी बुवासो झांजुर्णे यांच्या शेतावर या उपक्रमाचे थेट प्रात्यक्षिक दाखवून परिसरातील शेतकऱ्यांना हुमणी किडीच्या प्रादुर्भावापासून पिके कशी वाचवावीत, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या तालुक्यात तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी अशोक जगदाळे आणि उप कृषी अधिकारी अजित सोनलकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन कार्यरत आहे. हुमणी कीड ही प्रामुख्याने पिकांच्या मुळांना मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहचवते. या किडीचे वेळीच नियंत्रण करण्यासाठी प्रौढ भुंगेरे नष्ट करणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सुरू होताच जून आणि जुलै महिन्यात संध्याकाळी ७ ते ९ च्या दरम्यान बाभूळ, कडुनिंब किंवा बोर या झाडांवर हे हुमणीचे भुंगेरे मोठ्या संख्येने गोळा होतात. हे भुंगेरे झाडांच्या फांद्या जोरात हलवून खाली पाडावेत आणि रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा तात्काळ नाश करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
प्रकाश सापळ्यांमुळे अंडी रोखण्यात यश; पिकांचे उत्पादन वाढणार: किडीच्या जीवनचक्राचा वेध घेत कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, भुंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी शेतात किंवा शेताच्या जवळ ‘लाईट ट्रॅप’ (Light Trap / प्रकाश सापळे) लावणे अत्यंत फायदेशीर ठरते. या प्रकाश सापळ्यांमुळे प्रौढ भुंगेरे आधीच नष्ट झाल्याने ते जमिनीत अंडी घालू शकत नाहीत. परिणामी, शेतात हुमणीची अळी तयार होत नाही आणि अळी न झाल्यामुळे पिकांच्या मुळांचे होणारे अतोनात नुकसान पूर्णपणे टाळता येते. या जैविक व यांत्रिक नियंत्रणामुळे भविष्यातील पिकांचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
सासकल गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाश (लाईट) सापळे लावले आहेत, अशी माहिती सासकलचे कृषी सेवारत्न सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी यावेळी दिली. कृषी विभागाच्या या ‘बांधावरील’ सक्रिय कामगिरीमुळे सासकल आणि परिसरातील शेतकरी बांधवांनी प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.
