बापूराव जगताप यांच्याकडून नेहमीच सकारात्मक पत्रकारिता : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार

ज्येष्ठ संपादक बापूराव जगताप व ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न

। लोकजागर । फलटण । 1 जून 2026 ।

बापूराव जगताप हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आणि अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये सेवा देत असताना संस्थेविषयीची त्यांची तळमळ व आत्मीयता नेहमीच मोठी राहिली आहे. राजकारण, शिक्षण आणि समाजकारणासोबतच त्यांनी पत्रकारितेतही आपली जिद्द दाखवून दिली आहे. आजच्या काळात अनेकदा बातमीमागे बातमीदाराचे ‘विशिष्ट कारण’ दडलेले असते, मात्र बापूराव जगताप यांनी नेहमीच सकारात्मक आणि निस्पृह पत्रकारिता केली आहे. ते एक दिलदार आणि मोठ्या मनाचे माणूस आहेत. दुसरीकडे, आज समाजात केमिकल ड्रग्सची समस्या अत्यंत भीषण बनत चालली असून, या घातक समस्येविरोधात व व्यसनमुक्तीसाठी ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड करत असलेले सामाजिक प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहेत. या व्यसनमुक्तीच्या कार्यावर आता सर्वांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण येथील हॉटेल सेलिब्रेशनच्या हॉलमध्ये जगताप कुटुंबीय आणि फलटणच्या पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ संपादक बापूराव जगताप व ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून श्रीमंत संजीवराजे बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील अनपट, पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नानासो इवरे आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.

चांगल्या नेतृत्वाच्या संगतीचे उत्तम उदाहरण म्हणजे बापूराव जगताप: माजी आमदार दीपक चव्हाण
शुभेच्छा देताना माजी आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, बापूराव जगताप हे ग्रामीण भागातून आणि संघर्षातून पुढे आलेले खंबीर व्यक्तिमत्त्व आहे. श्रीमंत संजीवराजे यांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात नोकरीच्या पलीकडे जाऊन नेहमी आपलेपणाने सेवा केली. एका चांगल्या व ध्येयवादी नेतृत्वाच्या संगतीत आल्यावर व्यक्ती कशी घडते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बापूराव आहेत. तसेच पोपटराव मिंड हे देखील आपल्या लेखणीच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना प्रभावीपणे वाचा फोडत असतात, असे सांगत त्यांनी दोन्ही पत्रकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

’रामआदेश’च्या माध्यमातून तालुक्याचा विकास मांडला: अरविंद मेहता
ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी दोन्ही सत्कारमूर्तींच्या प्रवासावर प्रकाश टाकला. फलटणच्या पत्रकारितेने नेहमीच समाजहिताला प्राधान्य दिले आहे. राजघराण्याशी असलेल्या निकटच्या संबंधातून आणि प्रेमातून बापूराव जगताप यांनी पत्रकारिता सुरू केली. सुरुवातीला ‘रामनगर’ वृत्तपत्राच्या माध्यमातून रामनगरीचा इतिहास आणि त्यानंतर ‘रामआदेश’ या वृत्तपत्राच्या माध्यमातून तालुक्याचे राजकारण, समाजकारण व विकास लोकांसमोर मांडण्याचे प्रामाणिक काम त्यांनी केले. तर पोपटराव मिंड यांनी सुरुवातीला खटाव तालुक्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करत नेहमी समाजाची बाजू घेतली. फलटणमधून काम करताना पत्रकारितेच्या सोबतीने ते करत असलेले व्यसनमुक्तीचे कार्य समाजासाठी अत्यंत उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

श्रीमंत संजीवराजेंच्या प्रेरणेमुळेच मी घडलो: बापूराव जगताप
सत्काराला उत्तर देताना बापूराव जगताप भावूक होत म्हणाले, मी आज जे काही आहे, ते केवळ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विश्‍वासामुळे आणि प्रेरणेमुळे घडलो आहे. त्यांनी दिलेली प्रत्येक संधी आणि जबाबदारी मी आजवर प्रामाणिकपणे पार पाडली असून, इथून पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेली प्रत्येक जबाबदारी सार्थ ठरवेन.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाज घडवण्याचे काम सुरूच राहील: पोपटराव मिंड
ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मी सुरुवातीला मायणी (खटाव) येथे कार्यरत असलो, तरी माझी मायभूमी असलेल्या फलटणकडे माझे नेहमीच बारीक लक्ष होते. फलटणमध्ये आल्यानंतर येथील सर्व पत्रकार बांधवांचे मला अत्यंत मोलाचे सहकार्य लाभले. पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडून समाज घडवण्याचे आणि त्यासोबतच सुरू असलेले व्यसनमुक्तीचे कार्य मी भविष्यातही अखंडपणे सुरू ठेवणार आहे.

या कौटुंबिक व कौतुकाच्या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. प्रारंभी शेखर जगताप यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. बापूराव जगताप व पोपटराव मिंड यांचा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नानासो इवरे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राजकुमार गोफणे यांनी केले. या कार्यक्रमाला फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

Spread the love