साप्ताहिक ‘समर्थ नायक’चा फलटणमध्ये दिमाखदार प्रकाशन सोहळा; सहसंपादक हिंदुराव गायकवाड यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा.
। लोकजागर । फलटण । ६ जून २०२६ ।
“पत्रकारिता हे केवळ एक क्षेत्र नसून ते समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. पत्रकारांची लेखणी ही नेहमी सत्य, न्याय आणि समाजहितासाठीच चालली पाहिजे. विशेषतः आजच्या तरुण पत्रकारांनी आपली लेखणी सक्षम, अभ्यासपूर्ण आणि तितकीच निर्भीड ठेवून गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले पाहिजे. समाजातील ज्वलंत प्रश्न अचूकपणे मांडून लोकांच्या हक्कासाठी बुलंद आवाज उठविणे ही पत्रकारांची सर्वात मोठी जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी केले.
जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नवे वृत्तपत्र साप्ताहिक ‘समर्थ नायक’चा प्रकाशन सोहळा फलटण येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून साप्ताहिक ‘समर्थ नायक’चे सहसंपादक हिंदुराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना बेडकिहाळ यांनी, समाजातील सर्व घटकांनी आता एकजुटीने काम करण्याची गरज व्यक्त केली. सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि समाजहिताच्या प्रामाणिक कार्यातूनच देशाची व समाजाची प्रगती साध्य होऊ शकते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या सोहळ्यादरम्यान सहसंपादक हिंदुराव गायकवाड यांचा वाढदिवस मान्यवरांच्या हस्ते केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचे मनभरून कौतुक केले. या कार्यक्रमाला फलटण शहर आणि परिसरातील तरुण वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. उपस्थित वाचकांनी व नागरिकांनी ‘समर्थ नायक’ साप्ताहिकाच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. हे वृत्तपत्र आगामी काळात समाजातील सर्वसामान्यांचा खऱ्या अर्थाने आवाज बनेल आणि लोकहिताचे कार्य करेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. एकूणच या कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत प्रेरणादायी, उत्साहवर्धक आणि सामाजिक बांधिलकीची प्रकर्षाने जाणीव करून देणारे ठरले.
या मान्यवरांची लाभली प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला उद्योजक प्रमोद निंबाळकर, महेशशेठ गरवालिया, दैनिक ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी विकास शिंदे, ‘लोकशाही भारत’चे संपादक सागर चव्हाण, ‘चाणक्य न्यूज’चे संपादक योगेश गंगतीरे, ‘प्रगती चळवळ’चे संपादक प्रमोद सस्ते, सचिन वाघ, सचिन शेळके, कैलास सोडमिशे, अमोल सोडमिशे, संतोष भोईटे, शरद जगताप, शेखर करचे, अमित साळुंखे, गणेश पवार, मधुकर बनकर, बबन बनकर, युवराज चोपडे, सम्राट गायकवाड, सुनील हुबरे, उदय भोसले, अमोल काकडे, सचिन गनदास, प्रा. शंकर जठार , व्यंकटेश भोईटे, अमर पवार आणि अनिकेत पवार उपस्थित होते.
तसेच कामगार व सामाजिक संघटनांच्या वतीने क्रांतीसूर्य जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव संजयकुमार निकाळजे, अध्यक्ष अमोल झेंडे, पुणे जिल्हा अध्यक्ष व ‘प्रबुद्ध राष्ट्र’चे उपसंपादक लखन वसंत कडाळे, भीम क्रांती कामगार संघटनेचे संजय अब्दागिरे, भीमक्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुजय काकडे, महाराष्ट्र असंघटित बांधकामगार संघटनेचे राजकुमार सुतार, जुबेर कोतवाल, राजेंद्र शेळके, राजकुमार काकडे आणि महादेव अप्पा काकडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
