महात्मा फुले यांचे कटगुण येथे भव्य स्मारक, तर नायगावमध्ये महिला प्रशिक्षण केंद्रासाठी विशेष तरतूद
। लोकजागर । सातारा । शनिवार, दि. ७ मार्च २०२६ ।
राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यासाठी विकासाचे नवे दालन उघडले आहे. हा अर्थसंकल्प प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार प्रमुख स्तंभांवर आधारित असून, सातारा जिल्ह्यातील शेतकरी, पर्यटन आणि वारसास्थळांच्या जतनासाठी यात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
किल्ले आणि वारसास्थळांचे संवर्धन: छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील १२ किल्ल्यांच्या वारसा जतनासाठी सरकारने विशेष तरतूद केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तसेच, ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
समाजसुधारकांच्या स्मृतींना उजाळा: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त (११ एप्रिल २०२६) त्यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्रासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे मानसिक आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांसाठी ‘निसर्गोपचार केंद्र’ उभारले जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी ‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी: जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी सर्वात मोठी घोषणा म्हणजे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तसेच, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे, ज्याचा मोठा लाभ सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल.
यासोबतच कराड विमानतळाच्या विस्तारीकरणासाठीही अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्याच्या दळणवळण आणि पर्यटन विकासाला मोठी गती मिळणार आहे.
