। लोकजागर वृत्त । फलटण । २१ जुलै २०२६ ।
सहकार महर्षी हणमंतराव पवार यांचे सहकारातील कर्तृत्व मोठे आहे. पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेला ‘श्रीराम बझार’ यशस्वीपणे चालवण्यात त्यांनी घेतलेले परिश्रम तालुक्यातील सहकार क्षेत्रासाठी अत्यंत आदर्शवत आहेत. त्यामुळे श्रीराम कारखाना, श्रीराम बझार आणि शिवनेरी कुक्कुटपालन संस्था या सर्व संस्थांच्या अधिक प्रगतीसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवे ते सर्व सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन फलटण – कोरेगांव विधानपसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी केले. तालुक्यातील सहकार चळवळ गतिमान ठेवणे हीच खरी हणमंतराव पवार यांना आदरांजली ठरेल, असे ते म्हणाले.
सहकार महर्षी हणमंतराव पवार यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त श्रीराम बझार येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी सचिन पाटील यांनी हणमंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर बझारचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांनी स्वागत केले. फलटण शहर व ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोणत्याही योजना पूर्ण करताना गट-तट आणि पक्ष न पाहता काम केले जाईल, असे आश्वासन यावेळी आमदार पाटील यांच्याकडून देण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमास श्रीराम बझारचे ज्येष्ठ संचालक महादेवराव पवार, उपाध्यक्ष दिलीपसिंह भोसले, संचालक बापूराव गावडे, श्रीमती प्रभावती गरुड, रविंद्र बेडकिहाळ, मारुती गावडे, चंद्रकांत शिंदे, अनिल रणवरे, तेजसिंह भोसले, शितल अहिवळे, नितीन भोसले, सुभाष कर्णे, आनंदराव शिंदे, माधवी पवार, तुषार गांधी, आनंदराव बेलदार, जयकुमार शिंदे, महादेवराव पोकळे, श्रीमती पुष्पावती पवार, धनंजय पवार, पल्लवी पवार, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, अमोल सस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सचिन पाटील यांची तत्परता
कार्यक्रमा दरम्यान बझारचे उपाध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी श्रीराम बझारच्या बाहेर दोन्ही बाजूंनी उभ्या राहणार्या वाहनांमुळे ग्राहकांना होणार्या त्रासाकडे लक्ष वेधले आणि तेथे कायमस्वरूपी वाहन बंदी क्षेत्र घोषित करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत आ. सचिन पाटील यांनी तात्काळ फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बझारच्या बाहेरील बाजूस तात्काळ वाहन बंदी क्षेत्र लागू करण्याचे आदेश दिले. यावर मुख्याधिकार्यांनी त्वरित पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
उपेक्षित ‘संतोषगडा’ची दखल
आभार प्रदर्शनाच्या भाषणात संचालक रवींद्र बेडकिहाळ यांनी तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती असलेल्या ऐतिहासिक संतोषगडाचा विकास करून तेथे पर्यटन स्थळ विकसित करण्याची विनंती केली. या सूचनेलाही आमदार सचिन पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी बझारचे सरव्यवस्थापक अनंत पाटील, अमोल बनसोडे, रवींद्र शिंदे, मेघराज कारंडे यांच्यासह बझारचे अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
