सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फलटण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

। लोकजागर वृत्त । फलटण । २१ जुलै २०२६ ।

लडाख येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फलटण तहसील कार्यालयासमोर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान देशातील शिक्षण क्षेत्रात वाढणाऱ्या गैरप्रकारांबाबत कार्यकर्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पेपरफुटी ही केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित समस्या नसून ती संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला लागलेली गंभीर विकृती असल्याचे मत आंदोलकांनी मांडले. शिक्षणातील पारदर्शकता आणि गुणवत्तेवर अशा प्रकारांमुळे अत्यंत विपरीत परिणाम होत असून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप या वेळी करण्यात आला.

धरणे आंदोलनादरम्यान बोलताना कार्यकर्त्यांनी शिक्षणाच्या वाढत्या खाजगीकरणावर आणि असमानतेवर जोरदार प्रहार केला. व्यावसायिक शिक्षण आणि खाजगीकरणामुळे केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या घटकांनाच चांगल्या संधी उपलब्ध होत असून ग्रामीण व गरीब विद्यार्थी स्पर्धेत मागे पडत असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. देशातील शिक्षण व्यवस्थेत निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच पेपरफुटी व इतर गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली.

या आंदोलनात कालिदास चोरमले, निवृत्ती खताळ, नानासो गोवेकर, वैभवराज नरुटे, नितीन सुळ, गणेश कुंभार, विकास नाळे, सागर गावडे, मंगेश आवळे, कैलास रणदिवे यांच्यासह अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.

Spread the love