महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी फलटण शहर उत्सव समितीने पुढाकार घेतला असून ५ एप्रिल रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे.
। लोकजागर । फलटण । २४ मार्च २०२६ ।
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून फलटण शहरात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची मोठी लगबग सुरू झाली आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती, फलटण यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि वैचारिक प्रबोधन घडवून आणण्यासाठी विशेष निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा मुख्य विषय महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित असून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा अभ्यास करून लेखनातून आपली मांडणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वैचारिक प्रगल्भतेसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
ही निबंध स्पर्धा एकूण चार गटांमध्ये विभागण्यात आली असून, यामध्ये इयत्ता चौथी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते पदवी (१५ वी) आणि खुला गट अशा विविध स्तरांवरील स्पर्धकांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि प्रेरणादायी पुस्तके देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहनपर सन्मानपत्र दिले जाणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून सहभाग पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. स्पर्धेसाठी लागणारे लेखन साहित्य देखील आयोजकांकडूनच उपलब्ध करून दिले जाणार आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन लिंकद्वारे नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी https://forms.gle/UGhnK6JHLXBR5a7Z9 या लिंकचा वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता नाना पाटील चौक येथील संत सावता माळी महाराज मंदिर, फलटण येथे पार पडणार आहे. स्पर्धेचा निकाल ९ एप्रिल रोजी जाहीर करून विजेत्यांना दूरध्वनीद्वारे कळवण्यात येईल. नव्या पिढीने सामाजिक बांधिलकी जपावी आणि महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
