बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशनच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी हनुमंत लोंढे यांची नियुक्ती; उद्योजकांचे संघटन मजबूत करण्याचा निर्धार

पुणे येथे संपन्न झालेल्या ‘बीबीसी बिझनेस अँड स्टार्टअप कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान; जिल्ह्यातील नवउद्योजकांसाठी नवे व्यासपीठ उभे राहणार.

। लोकजागर । फलटण । २५ मार्च २०२६ ।

बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशन (BBCA) तर्फे सातारा जिल्ह्यातील व्यावसायिक संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने श्री. हनुमंत लोंढे यांची सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. १५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘बीबीसी बिझनेस आणि स्टार्टअप कॉन्क्लेव्ह २०२६’ या भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री. लोंढे यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांना एकत्र आणून व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या मोहिमेला आता अधिक गती मिळणार आहे.

या विशेष कार्यक्रमात बीबीसीचे माजी अध्यक्ष शामराव वाकोडे आणि विद्यमान अध्यक्ष प्रशांत तुळवे यांच्या हस्ते श्री. हनुमंत लोंढे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोंढे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील आर्थिक प्रगतीसाठी एक सक्षम आणि पारदर्शक व्यासपीठ उभे करणे हे बीबीसीचे मुख्य उद्दिष्ट आहे. श्री. हनुमंत लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात संस्थेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होईल, असा विश्वास बीबीसीच्या कोर टीमने यावेळी व्यक्त केला.

या गौरव सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सचिव संतोष येवले, खजिनदार धम्मदीप गवा गुरु, कार्याध्यक्ष निलेशदादा नितनवरे, प्रवक्ते विशाल गायकवाड, संघटक प्रशांतदादा घोगरे, सोशल मीडिया प्रमुख अभय नगरे आणि नितीनदादा गवई यांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मावळ तालुक्याचे अध्यक्ष संतोष शिंदे, पुणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख नवीन मगदूम, पिंपरी चिंचवड महिला आघाडी अध्यक्षा अनिता बलाढ्य, मावळ तालुका महिला अध्यक्षा विशाखा गायकवाड आणि पिंपरी चिंचवड अध्यक्ष अतुल रोकडे यांनीही उपस्थित राहून लोंढे यांचे अभिनंदन केले. “By the Community, For the Community” या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन ही संस्था नव्या पिढीला उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Spread the love