साखरवाडी आरोग्य केंद्रात लस मोफत उपलब्ध; भावी पिढी सुदृढ राहण्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार.
। लोकजागर । जिंती । २९ मार्च २०२६ ।
विद्यार्थिनींचा आरोग्याचा दर्जा सुधारावा, भविष्यात येणाऱ्या आरोग्य समस्यांना त्यांना सहजतेने सामोरे जाता यावे आणि कर्करोगासारख्या भयंकर आजारापासून संरक्षण मिळावे, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालय, जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही (HPV) लसीकरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी फलटण उप जिल्हा रुग्णालयाचे डॉ. एन. पी. तेली, ज्येष्ठ शिक्षक व समुपदेशक ताराचंद्र आवळे, आरोग्य विभाग प्रमुख हन्नुरे एस. एम., सौ. जमदाडे व्ही. एस. आणि नर्स सकाटे जे. ए. यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. एन. पी. तेली म्हणाले की, “आरोग्य विभागामार्फत सध्या गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबवली जात आहे. पात्र विद्यार्थिनींनी साखरवाडी आरोग्य केंद्रात जाऊन या लसीचा लाभ घ्यावा. ही लस सध्या मोफत उपलब्ध असून ती पूर्णपणे ऐच्छिक आहे. विद्यार्थिनींनी आपल्या पालकांच्या सल्ल्याने हे लसीकरण करून घ्यावे.”
समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी नमूद केले की, शाळा हे संस्काराचे माध्यम असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक दर्जा सुधारण्यासाठी शासन व संस्था विविध उपक्रम राबवत असते. कर्करोग हा कोणत्याही स्वरूपाचा असला तरी तो घातक आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही लस महत्त्वाची आहे. समाज माध्यमांवरील अफवांना बळी न पडता, पालकांशी सुसंवाद साधून आरोग्याच्या हिताचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक सोळंकी ए. आर. यांनी केले, तर आभार सौ. सोनवलकर ए. ए. यांनी मानले. या जनजागृतीपर कार्यक्रमास सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
