संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील घटनेने लोककलावंतांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; दोषींवर कडक कारवाईसाठी डॉ. भारत पाटणकर आक्रमक.
। लोकजागर । फलटण । ०४ एप्रिल २०२६ ।
संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथे तमाशा कलाकार आणि महिला कलावंतांवर गावगुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. तमाशातील मुलींची छेड काढणे आणि कलावंतांना मारहाण करणे, या प्रकारामुळे लोकसंस्कृतीचा वारसा जपणाया कलाकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून, दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राष्ट्रीय मुख्य समन्वयक डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे आणि उपाध्यक्ष प्रा. गौतम काटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या जत्रांचा हंगाम सुरू असून लोककलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, अशा घटनांमुळे त्यांना सन्मानाने जगणे कठीण झाले आहे. सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा मंडळावर झालेला हा हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा असून समाजकंटकांच्या वाढत्या हिंमतीचा हा नमुना असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी नमूद केले.
याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला, तरी केवळ गुन्हा दाखल करून प्रश्न सुटणार नाही, असे मत प्रवक्ते कॉ. विजय मांडके आणि कॉ. अविनाश कदम यांनी व्यक्त केले. शासनाने तमाशा फड मालकांना आणि कलाकारांना ठोस पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. “लोककलावंत सुरक्षित असतील तरच आपली कला आणि लोकसंस्कृती जिवंत राहील,” असा इशाराही विद्रोही सांस्कृतिक चळवळीने या निवेदनाद्वारे दिला आहे.
