संस्था स्वतः चालवता येत नसल्यानेच भाड्याने देण्याचा घाट; ‘स्वराज’ कारखाना हिमतीवर उभा केल्याचे सांगत विरोधकांच्या आरोपांचा घेतला खरपूस समाचार.
। लोकजागर वृत्त । फलटण । ७ जुलै २०२६ ।
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सद्यस्थितीवरून फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काल झालेल्या बैठकीला आता प्रसिद्धी पत्रकाद्वारे जोरदार उत्तर देण्यात आले आहे. कोणत्याही ‘सहकारी’ संस्थेला आपला श्रीराम कारखाना चालवायला देण्यास आमची काहीही हरकत नाही, परंतु हा कारखाना ‘खाजगी’ करण्याच्या त्यांच्या कोणत्याही मनसुब्यांना आमचा कायम आणि तीव्र विरोधच असणार आहे, असा स्पष्ट व थेट इशारा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. श्रीराम कारखान्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या विधानांचा आणि आरोपांचा समाचार घेण्यासाठी त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
तालुक्यातील सहकारी संस्थांच्या सद्यस्थितीवर आणि भवितव्यावर मोठी चिंता व्यक्त करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, या सर्व मंडळींचा सध्या सगळंच भाड्याने देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. श्रीराम कारखाना, मालोजी बँक आणि डेअरी यांसारख्या महत्त्वाच्या संस्था हे सर्व लोक स्वतःच्या ताकदीवर काहीही चालवू शकत नसल्यानेच, आता त्या संस्था दुसऱ्यांना भाड्याने देण्याचा घाट घातला जात आहे. स्वतःच्या अकार्यक्षमतेमुळेच या सर्व संस्था आज डबघाईला नेल्या जात आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. उपळवे येथील स्वराज कारखान्याच्या मुद्यावरून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देताना रणजितसिंह (रणजितदादा) म्हणाले की, उपळवे येथील कारखाना हा माझ्या आजोबांनी उभा केलेला नाही, तर तो मी स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टावर उभा केला आहे. आज फलटण तालुक्यात सर्वाधिक उसाचे गाळप आपला स्वराज कारखाना यशस्वीपणे करत आहे. यांनी स्वतःच्या वडिलोपार्जित संस्था मोडून खाल्ल्यामुळे, आम्ही हिमतीने उभा केलेला विकासाचा हा डोंगर आणि स्वराज कारखान्याचे यश बघून यांच्या पोटात दुखत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
नगराध्यक्षांवर १५ टक्के कमिशनचा खोटा आरोप करणाऱ्यांचा बुरखा फाडताना रणजितसिंह यांनी थेट सवाल केला की, १५ टक्क्यांचे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आधी जनतेला सांगावे की, फलटण शहराचे १२४ कोटींचे भुयारी गटार कुणी गायब केले? आणि त्यानंतरच त्यांनी अशा खोट्या वलग्ना कराव्यात. श्रीराम कारखान्याच्या आज झालेल्या पडझडीला आणि दुरवस्थेला नेमके कोण जबाबदार आहे, याचा पर्दाफाश करताना ते म्हणाले की, श्रीराम मंदिरात मीटिंग घेऊन, झोन बंदी उठवून श्रीराम कारखाना त्यावेळी नेमका कोणी बंद पाडला? या सगळ्या राजकीय दबावातूनच कै. हणमंतराव पवार यांचे अपघाती निधन झाले होते, हा पाप आणि अन्यायाचा इतिहास इथली जनता कधीही विसरणार नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली. शेवटी विरोधकांच्या भूमिकेवर प्रहार करताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, यांनी कितीही जादूटोणा किंवा राजकीय खेळी केल्या, तरी सुद्धा सूर्य हा उगवायचा राहणार नाही. फलटण तालुका हा राज्यातील सर्वात प्रगत आणि विकसित तालुका आपण सर्वांच्या साथीने करून दाखवणारच, आणि त्यासाठी फलटणची सुजाण जनता नेहमीच आमच्यासोबत खंबीरपणे उभी आहे.
