८ दिवसांत प्रत्येकी १५ हजार रुपये जमा करून १२ कोटींचे शेअर्स पूर्ण करा, कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी माझी; अनंत मंगल कार्यालयातील बैठकीत विरोधकांवर व सत्तेच्या गैरवापरावर कडक प्रहार.
। लोकजागर वृत्त । फलटण । ६ जुलै २०२६ ।
श्रीराम सहकारी साखर कारखाना एकेकाळी राज्यात एक आदर्श कारखाना होता आणि आम्ही हा कारखाना चालवायला घेताना त्याची केवळ आर्थिक कुवत पाहिली नाही. श्रीमंत मालोजीराजे यांनी सुरू केलेला हा कारखाना सुस्थितीत आणि तेवढ्याच वैभवाने चालवणे हाच आमचा प्रामाणिक हेतू होता. तुमच्या कुटुंबाची प्रगती करण्यासाठी मी स्वतःच्या कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून रात्रं-दिवस काम केले. आता कारखान्याच्या या गंभीर प्रश्नावर अंतिम निर्णय तुम्ही सर्व सभासदांनी घ्यायचा आहे. तुम्ही जर आता खंबीर निर्णय घेतला नाही, तर मी या भानगडीत पडणार नाही, असा स्पष्ट आणि थेट इशारा देत, या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येण्याचा माझा ठाम निर्णय आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत कारखान्यापुढील चालू कायदेशीर अडचणींवर आणि गाळप हंगामावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर आणि कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला खूष करण्यासाठी जर सत्तेचा असा चुकीचा वापर होणार असेल, तर आपल्याला सहज न्याय मिळणे आता अशक्य आहे, तो न्याय आपल्याला ओरबडून घ्यावा लागणार आहे. यावर तोडगा म्हणून येत्या आठ दिवसांत प्रत्येक सभासदाने १५ हजार रुपये भरून आपले शेअर्स पूर्ण करावेत. सर्व सभासदांकडून १२ कोटी रुपयांची शेअर्सची रक्कम जमा झाली की कारखान्याचे नख्त मूल्य सुधारेल आणि त्या बळावर कारखान्याला बँकेकडून कर्ज मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी माझी असेल. त्यानंतर आपल्याला हक्काचा कारखाना पुन्हा दिमाखात सुरू करता येईल. यात जर पुन्हा काही कायदेशीर अडचणी आणल्या गेल्या, तर वेळ आली तर सगळ्यांनी रस्त्यावर या, तुमच्या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेन, असे आवाहन त्यांनी केले. राजकीय सद्यस्थितीवर बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली की, आम्हाला पराभव पत्करावा लागला तरी आम्ही तुमच्यासाठी आजही लढत आहोत. दोन धरणे उभारली, कमिन्स कंपनी आणली, अडचणीतला कारखाना बाहेर आणला तरीही आपला आमदार निवडून येत नाही. कोरोना काळात जेवढ्या लोकांना आम्ही मदत केली, तेवढ्या लोकांनी जरी मतदान केले असते तरी आपला आमदार पडला नसता. झालेला पराभव हा माझा वैयक्तिक पराभव नसून मी केलेल्या त्यागाचा आणि परिश्रमाचा तो पराभव आहे. आमच्या तीन पिढ्यांनी तुमची सेवा केली असून तुमच्याकडे कधीही मतांचा गठ्ठा म्हणून पाहिले नाही, तर केवळ गरिबी हटाव हीच मोहीम राबवली. ३० वर्षांची आम्ही केलेली सेवा तुम्हीच विरोधकांच्या हातात दिली. आजपर्यंत विकासाला साथ मिळाली, आता तो विकास टिकवण्यासाठीही मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विरोधकांकडे लोकमत नाही आणि ते कधी येणारही नाही. त्यांनी सत्तेच्या माध्यमातून आमदारकी आणि नगरपालिका घेतली असून आता त्यांना श्रीराम कारखाना घ्यायचा आहे. आपला देवेंद्र फडणवीस यांना कोणताही विरोध नाही, पंतप्रधान होण्याची त्यांची पात्रता आहे, परंतु आमच्या गरीब सभासदांच्या संसाराची बसलेली घडी उद्ध्वस्त करू नका, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केले.
विरोधकांचे कारस्थान हाणून पाडू : दीपक चव्हाण
या बैठकीत बोलताना माजी आमदार दीपक चव्हाण यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. मुख्यमंत्री केवळ दोन-चार स्थानिक व्यक्तींचे ऐकून कारखान्याच्या उभारणीत व नवीन करारात कायदेशीर आडकाठी आणत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हे रचलेले राजकीय कारस्थान सर्वांनी मिळून हाणून पाडण्याची नितांत गरज असून, कारखान्याचे धुराडे पेटवणे हीच आपल्या सर्वांसाठी आणि तालुक्यासाठी शेवटची संधी आहे. साखरवाडी कारखाना सुरू राहिल्यानेच तो संपूर्ण भाग नावारूपाला आला आहे, हे लक्षात घेऊन विरोधकांना वेळीच रोखले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.
सहकार टिकवण्यासाठी संघर्ष करणार : श्रीमंत संजीवराजे
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सहकार क्षेत्र आणि खाजगी कारखानदारीतील मुख्य फरक स्पष्ट केला. शेतकर्यांच्या ऊसाला नेहमीच योग्य दर मिळावा आणि कामगारांचे पगार वेळेवर व्हावेत, याच पवित्र उद्देशाने हा कारखाना चालवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र, दुर्दैवाने केवळ राजकीय दबावापोटी कारखान्याबाबत चुकीचे निर्णय लादले जात आहेत. श्रीराम कारखान्याला या अभूतपूर्व अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आता सर्व सभासदांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असून, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करावा लागेल, असा स्पष्ट इशारा श्रीमंत संजीवराजे यांनी दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध मान्यवरांनी कारखान्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक संचालक संतोष खटके यांनी केले, तर चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी कारखाना निवडणुकीपासून ते सध्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेस आणि प्रशासकीय पत्रव्यवहाराची तांत्रिक व सविस्तर माहिती सर्व उपस्थित सभासदांना देऊन सद्यस्थिती स्पष्ट केली.
