धुळदेव येथील श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

। लोकजागर वृत्त । फलटण / धुळदेव । ४ जुलै २०२६ ।

रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव येथील विद्यार्थ्यांनी शासकीय पूर्व माध्यमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (स्कॉलरशिप) अत्यंत उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाचा आणि धुळदेव परिसराचा नावलौकिक वाढवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील दोन गुणवंत विद्यार्थिनी कु. राधिका लालासाहेब भिवरकर आणि कु. तनिष्का बाबासाहेब जगताप यांनी अत्यंत उत्कृष्ट गुण मिळवून यश संपादन केले असून आपली बौद्धिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. या विद्यार्थिनींच्या यशामुळे विद्यालयाची मान उंचावली आहे. या अत्यंत मानाच्या परीक्षेत मुख्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासोबतच, या वर्षी विद्यालयातील इयत्ता ५ वीचे तब्बल ७ विद्यार्थी आणि इयत्ता ८ वीचे ५ विद्यार्थी अशा एकूण १२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती धारक (पात्र) होण्याचा बहुमान मिळवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद मानले जात आहे.

विद्यालयातील या सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्रीमंत पेठकर एस. बी., श्री. अभंग एस. बी., श्री. गावडे ए. पी., सौ. कोकरे जे. एम., श्रीमंत लव्हाटे एस. एल., श्री. फडतरे एस. सी. आणि सौ. परमाळे एस. आर. या सर्व शिक्षक व मार्गदर्शकांचे मोलाचे व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी खडतर परिश्रम आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे. या घवघवीत यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, स्कूल कमिटीचे सर्व सदस्य तसेच धुळदेव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, समस्त पालकवर्ग व विद्यालय परिवाराच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक सदिच्छा देण्यात आल्या आहेत.

Spread the love