फलटण तालुक्यात अवकाळीने नुकसान; आमदार सचिन पाटील आणि अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी गाठले शेतकऱ्यांचे बांध

आरडगाव, कापडगाव, चांभारवाडी व हिंगणगाव परिसरात गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान; तहसीलदार व कृषी विभागाला तातडीने पंचनाम्यांचे आदेश.

। लोकजागर । फलटण । ०५ एप्रिल २०२६ ।

फलटण तालुक्यात ३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे कंबरडे मोडले आहे. आरडगाव, कापडगाव, चांभारवाडी आणि हिंगणगाव या परिसरात निसर्गाचा कोप पाहायला मिळाला असून, यात ऊस, मका, कांदा, गहू यांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांशिवाय अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आणि घरांचेही अतोनात नुकसान झाले आहे. ही परिस्थिती समजताच आमदार सचिन पाटील आणि युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने बाधित क्षेत्राचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात आमदार सचिन पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, मंडल अधिकारी खाडे व धेंडे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. “तालुक्यातील बळीराजा मोठ्या संकटात आहे. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत आणि पुढील कार्यवाहीसाठी अहवाल शासन दरबारी पाठवावेत,” असे स्पष्ट आदेश आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिले.

यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, “तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचे हे दुःख मी शासन दरबारी मांडणार असून, बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” या नुकसान पाहणी दौऱ्यात विलासराव नलवडे, सुरेश तात्या भोईटे, रमेश भोईटे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचे सावट पसरले आहे.

Spread the love