मॉर्निंग वॉकला जाताना महिलांनी दागिने सांभाळावेत; संशयास्पद हालचाल दिसल्यास ‘११२’ वर संपर्क करण्याचे पोलीस प्रशासनाचे निर्देश.
। लोकजागर । फलटण । १८ एप्रिल २०२६ ।
सध्या सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक उच्चांक गाठला असून, मौल्यवान दागिन्यांच्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशन सतर्क झाले आहे. वाढत्या सोन्याच्या किमती आणि चेन स्नॅचिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, फलटण शहर पोलिसांनी नागरिकांसाठी, विशेषतः महिलांसाठी महत्त्वाची सुरक्षा नियमावली जाहीर केली आहे. आपण कष्ट करून सोन्याचे दागिने खरेदी करतो, त्यामुळे अशा दागिन्यांची चोरी होऊ नये म्हणून नागरिकांनी स्वतःहून दक्षता बाळगणे आता अनिवार्य झाले आहे.
अनेक नागरिक सकाळी किंवा संध्याकाळी आरोग्यासाठी ‘वॉकिंग’ला जातात, अशा वेळी अनेक महिलांच्या अंगावर मौल्यवान दागिने असतात. एकट्या-दुकट्या महिलेला गाठून भरधाव दुचाकीवरून येणारे चोरटे दागिने हिसकावून नेण्याच्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेऊन पोलिसांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने चालण्यासाठी जाताना शक्यतो कमी रहदारीच्या किंवा निर्जन रस्त्यांचा वापर करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच अंगावर मंगळसूत्र किंवा सोन्याचे इतर दागिने असतील, तर ते बाहेरील व्यक्तीला सहज दिसणार नाहीत, अशा बेताने परिधान करावेत किंवा ते झाकून ठेवावेत.
आपल्या घराशेजारी, परिसरात किंवा वॉकिंगच्या मार्गावर रात्री-अपरात्री कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती दिसून आल्यास तात्काळ सावध व्हावे आणि पोलिसांशी संपर्क साधावा. शहरात कुठेही संशयास्पद परिस्थिती आढळल्यास किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास नागरिकांनी वेळ न घालवता ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर डायल करून माहिती द्यावी. नागरिकांच्या सतर्कतेमुळेच अशा प्रकारच्या गुन्ह्यांना लगाम घालणे शक्य होणार असल्याचे फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
