सासकल येथे ‘एल निनो’ जनजागृतीसाठी शेतकरी शिवार फेरी; बदलत्या हवामानात शेती वाचवण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार

कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन; सातारा जिल्हा कृषी विभागाकडून विशेष मार्गदर्शन.

। लोकजागर । फलटण । १८ एप्रिल २०२६ ।

बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर निर्माण झालेली आव्हाने आणि ‘एल निनो’च्या संभाव्य धोक्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने फलटण तालुक्यातील सासकल येथे ‘एल निनो जनजागृती शेतकरी शिवार फेरी’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मान्सूनमधील अनिश्चितता आणि त्यावर करायच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शेतकरी वामन दिनकर मुळीक, मनोहर दिनकर मुळीक, ज्ञानदेव रघुनाथ मुळीक, सिताराम दिनकर मुळीक यांच्यासह परिसरातील प्रगतशील शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सातारा जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी शहाजी शिंदे आणि उप कृषी अधिकारी अजित सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनजागृती उपक्रम राबविला जात आहे. या शिवार फेरीदरम्यान सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, एल निनोमुळे मान्सूनचा पाऊस कमी होण्याची किंवा तो अनिश्चित राहण्याची शक्यता असते. याचा थेट परिणाम खरीप हंगामावर होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच पिकांचे आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे काळाची गरज आहे.

हवामानातील या बदलाचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने काही महत्त्वाचे तांत्रिक उपाय सुचवले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जास्त पाणी लागणाऱ्या भात किंवा ऊस यांसारख्या पिकांऐवजी बाजरी, ज्वारी, मका, सूर्यफूल, सोयाबीन, तूर आणि मूग यांसारख्या कमी कालावधीत येणाऱ्या आणि दुष्काळ सहन करणाऱ्या पिकांची निवड करावी. तसेच आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास शेतीतील जोखीम कमी होऊन उत्पन्नात सातत्य राहते. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर अनिवार्य करावा, तसेच मल्चिंगचा वापर करून बाष्पीभवन रोखावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय खते, शेणखत आणि कंपोस्ट खताचा वापर वाढवण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला. एल निनोच्या काळात वाढत्या उष्णतेमुळे पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यासाठी नियमित निरीक्षण आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करणे आवश्यक आहे. या कठीण परिस्थितीत आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ अंतर्गत पिकांचा विमा उतरवावा आणि हवामान विभागाच्या अंदाजांनुसार शेतीची कामे करावीत, असे आवाहनही सचिन जाधव यांनी केले. या शिवार फेरीमुळे सासकल आणि परिसरातील शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्याचे नवे बळ मिळाले आहे.

Spread the love