पाणी टंचाई आढावा बैठकीत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; टँकरची मागणी येताच तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना.
। लोकजागर । सातारा । १८ एप्रिल २०२६ ।
एप्रिल आणि मे महिन्यातील वाढता उन्हाळा आणि संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता, सातारा जिल्ह्याच्या कोणत्याही भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठा हा प्रामुख्याने पिण्यासाठीच राखीव ठेवावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.
या महत्त्वाच्या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी (प्रांत) आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील पाणी साठ्याची स्थिती आणि टंचाईग्रस्त भागातील नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी टँकरच्या नियोजनाबाबत कडक सूचना दिल्या. ज्या गावांसाठी किंवा वाडी-वस्त्यांसाठी टँकरची मागणी येईल, तिथे संबंधित यंत्रणेने तात्काळ भेट देऊन पाणीपुरवठा सुरू करावा. ग्रामीण भागातील बंद असलेले हातपंप तातडीने दुरुस्त करावेत आणि जिथे गरज आहे तिथे नवीन विंधन विहिरी घेण्याचे काम हाती घ्यावे, असे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, टंचाईच्या काळात थकबाकी अभावी कोणत्याही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू नये, अशा सूचनाही त्यांनी वीज वितरण कंपनीला दिल्या आहेत.
जिल्ह्यातील धरण प्रकल्पांमधील पाणीसाठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल, या दृष्टीने त्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे पाणी मिळणे हा हक्क असून, त्यासाठी विहीर अधिग्रहण करण्यासह सर्व आवश्यक उपाययोजना प्रशासनाने सतर्क राहून कराव्यात. पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि प्राधान्याने काम करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
