पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार; रस्ता सुरक्षा मोहिमेला मिळणार बळकटी.
। लोकजागर । मुंबई । २३ एप्रिल २०२६ ।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि परिवहन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’ची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जनजागृती मोहिमेला अधिक प्रभावी करण्यासाठी लोकप्रिय अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नियुक्तीचा पाच वर्षांचा करार हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या नियुक्तीमुळे एसटी महामंडळाच्या विविध लोकोपयोगी योजना आणि रस्ता सुरक्षेचे नियम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सिनेसृष्टीतील या लोकप्रिय दांपत्याची मदत होणार आहे.
परिवहन विभागाच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’ची परिणामकारकता वाढवणे, प्रवाशांमध्ये जनजागृती करणे आणि महत्त्वाचे सामाजिक संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा या निवडीमागील मुख्य उद्देश आहे. रस्ता सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी आणि एसटी प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी या दोन्ही कलाकारांचा सहभाग येत्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
