स्थानिक युवकांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय.
। लोकजागर । सातारा । २३ एप्रिल २०२६ ।
सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे अत्याधुनिक आयटी पार्क उभारण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. नागेवाडी येथे माहिती तंत्रज्ञान पार्क विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) ४२.५५ हेक्टर आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तांत्रिक विकासासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळावी, हा या आयटी पार्क उभारणीमागील मुख्य उद्देश आहे. यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा) येथील गट क्रमांक ३०८/१ मधील ४२.५५ हेक्टर आर इतकी शासकीय जमीन एमआयडीसीला हस्तांतरित केली जाणार आहे. ही जमीन एमआयडीसीला सध्याच्या शेत जमिनीच्या बाजारभावाने खरेदी करावी लागणार असून, ती भोगवटादार वर्ग-२ म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नागेवाडी येथे आयटी पार्क उभारल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांना आपले प्रकल्प येथे सुरू करता येतील. यामुळे सातारा परिसरातील अभियांत्रिकी (Engineering) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील पदवीधर युवकांना आता पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांकडे धाव न घेता स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्याच्या आर्थिक वैभवात भर पडणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे.
