मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी फलटणमध्ये ‘कुंडी प्रोजेक्ट २०२६’ यशस्वी; ६० हून अधिक ठिकाणी पाण्याची सोय

सुखकर्ता NGO चा स्तुत्य उपक्रम; शहरात ८ नवीन कुंड्यांची भर.

। लोकजागर । फलटण । ८ मे २०२६ ।

उन्हाळ्याच्या तीव्रतेत मोकाट प्राणी आणि पक्ष्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी फलटणमधील ‘सुखकर्ता NGO’ च्या वतीने राबविण्यात आलेला ‘#KUNDIPROJECT2026’ यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या उपक्रमांतर्गत शहरात ८ नवीन पाण्याच्या कुंड्या बसवण्यात आल्या असून, पूर्वीच्या ४ जुन्या कुंड्यांची गरज असलेल्या नवीन ठिकाणी पुनर्स्थापना करण्यात आली आहे. या नव्या नियोजनामुळे आता फलटण शहरातील १२ नवीन ठिकाणांसह एकूण ६० हून अधिक ठिकाणी गाई, श्वान आणि पक्ष्यांसाठी पाण्याची उत्तम सोय झाली असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख शाम पवार यांनी दिली.

सुखकर्ता NGO गेल्या काही वर्षांपासून शहरात सातत्याने हा उपक्रम राबवत आहे. यापूर्वी ‘कुंडी प्रोजेक्ट २०२४’ आणि ‘२०२५’ अंतर्गत शहराच्या विविध भागांत ५० हून अधिक कुंड्या बसवण्यात आल्या होत्या. यावर्षीच्या प्रकल्पानंतर हा आकडा ६० च्या पार गेला असून, या माध्यमातून दररोज हजारो मुक्या प्राण्यांची तहान भागत आहे. केवळ पाण्याची सोयच नव्हे, तर ही संस्था फलटणमधील मोकाट गाईंवर मोफत उपचार करणे, त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था करणे आणि प्राण्यांच्या समस्यांबाबत जनजगृती करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे.

संस्थेच्या वतीने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन प्लास्टिक तसेच कचऱ्यामुळे प्राण्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे (PPT Presentation) प्रबोधनही केले जाते. या सेवाकार्यात फलटणमधील अनेक सेवाभावी नागरिक आणि दानशूर व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आणि मोकाट प्राण्यांच्या सेवेसाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन शाम पवार यांनी केले असून, या मोहिमेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि मदतीचा हात देणाऱ्या नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Spread the love