भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत फलटणच्या ‘श्रीराम विद्याभवन’ची अनया पवार राज्यात प्रथम

अनया पवारने शाळेचे नाव राज्य पातळीवर नेले; तिचे यश अभिमानास्पद : रविंद्र बेडकिहाळ

। लोकजागर । फलटण । ८ मे २०२६ ।

आपल्या विद्यालयातील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. अनया किशोर पवार हिने भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून संस्थेचे नाव राज्य पातळीवर नेले आहे, ही बाब आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी रविंद्र बेडकिहाळ यांनी काढले.

भारती विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या प्राथमिक (प्रायमरी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शाळेच्या परिसरात उत्साहात पार पडला.

राज्यात पहिली आलेल्या अनया पवार हिच्यासह विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल श्रेयश संकपाळ, भूमी गायकवाड, श्रावणी अहिवळे, आस्था विश्‍वकर्मा, ध्रुव कळंबे, राजवीर मोरे, अवनी जाधव आणि यलुबाई जाधव या विद्यार्थ्यांचा सत्कार भारती विद्यापीठाचे आजीव सदस्य रविंद्र बेडकिहाळ व भारती विद्यापीठ खारघर (मुंबई) येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनयाला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना रविंद्र बेडकिहाळ यांनी माहिती दिली की, भारती विद्यापीठाच्या आगामी बैठकी दरम्यान अनया पवार हिचा पुणे येथे स्वतंत्र आणि विशेष सत्कार करण्यात येईल. अशा यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

अडचणींवर मात करून सक्षम बना: प्राचार्या वैशाली जाधव

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या वैशालीताई जाधव म्हणाल्या, शिक्षणाचे महत्त्व ओळखून डॉ. पतंगराव कदम यांनी 1964 मध्ये प्रतिकूल परिस्थितीत भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज या संस्थेला 62 वर्षे पूर्ण होत आहेत. ग्रामीण भागातील मुले इंग्रजी-गणित विषयात मागे राहू नयेत, हा त्यांचा दूरदृष्टीकोन अनयासारख्या विद्यार्थ्यांनी सार्थ ठरवला आहे. त्यांनी पुढे सल्ला दिला की, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी विद्यार्थ्यांनी त्यावर मार्ग शोधून पुढे जाणे गरजेचे आहे, कारण अडचणीच आपल्याला सक्षम बनवतात. अभ्यासात सातत्य आणि सराव ठेवल्यास अपेक्षित यश नक्कीच मिळते.

या कार्यक्रमाप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय समितीच्या अध्यक्षा अलका बेडकिहाळ, प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले. या सोहळ्यासाठी शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व स्तरांतून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Spread the love