फलटणमध्ये उद्या मध्यरात्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ‘दुग्ध अभिषेक’; जयंती सोहळ्याची जय्यत तयारी

उत्सव समितीचा पुढाकार; जयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य सोहळ्याचे आयोजन.

। लोकजागर । फलटण । १२ मे २०२६ ।

स्वराज्याचे रक्षणकर्ते आणि असीम शौर्याचे प्रतीक असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून फलटण शहरात भव्य ‘दुग्ध अभिषेक सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, फलटण यांच्या वतीने हा गौरवशाली सोहळा बुधवार, दिनांक १३ मे २०२६ रोजी जयंतीच्या पूर्वसंध्येला पार पडणार आहे. आपल्या अचाट पराक्रमाने शत्रूला नमविणाऱ्या आणि बलिदानाने इतिहास घडविणाऱ्या शंभूराजांना अभिवादन करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविला जात आहे.

हा मंगलमयी सोहळा उद्या रात्री ११:०० वाजता फलटण येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात संपन्न होईल. जयंतीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या अभिषेकासाठी फलटण शहर व परिसरातील शिव-शंभू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून महाराजांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

विजेसारखी तलवार चालवून स्वराज्याची सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या या लाडक्या राजाचा जयघोष करत, हा दुग्ध अभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत असून, संपूर्ण पुतळा परिसर भगव्या पताकांनी आणि रोषणाईने सजला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी फलटणकरांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Spread the love