पुरातत्व विभागाकडून फलक लावून इशारा ; नवदांपत्यांचा आणि फोटोग्राफर्सचा मोठा हिरमोड
। लोकजागर । फलटण । ११ मे २०२६ ।
फलटण शहराचे वैभव आणि प्राचीन वास्तुकलेचा अद्वितीय नमुना असणाऱ्या ऐतिहासिक श्री जबरेश्वर मंदिर परिसरात आता ‘प्रि-वेडिंग’ फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शंभर वर्षांहून अधिक जुनी ऐतिहासिक वास्तू, दुर्मिळ शिल्पकला आणि प्राचीन संस्कृतीचा अनमोल वारसा जतन करण्याच्या हेतूने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचे मानले जात असून पुरातत्व विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून कोणीही या परिसरात चित्रीकरण करताना आढळल्यास, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मंदिर परिसरात फलक लावून देण्यात आला आहे.
जबरेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून तो एक ऐतिहासिक ठेवा आहे. अशा प्राचीन वास्तूंचे सौंदर्य आणि पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाकडून वेळोवेळी विविध निर्बंध लादले जातात. याच निर्बंधांचा एक भाग म्हणून मंदिर परिसरातील व्यावसायिक किंवा हौशी चित्रीकरणावर ही बंदी घालण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या गर्दीमुळे आणि चित्रीकरणाच्या साहित्यामुळे प्राचीन शिल्पांचे नुकसान होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे.
फलटण शहर आणि परिसरातील अनेक तरुण जोडप्यांसाठी हे मंदिर ‘प्रि-वेडिंग’ शूटचे प्रमुख केंद्र बनले होते. येथील ऐतिहासिक खांब आणि कोरीव काम कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक हौशी नवदांपत्य या ठिकाणी गर्दी करत असत. मात्र, आता प्रशासनाने घातलेल्या या नवीन निर्बंधांमुळे हौशी नवदांपत्यांचा आणि फोटोग्राफर्सचा मोठा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे सुज्ञ नागरिकांकडून स्वागत होत असले तरी, तरुणाईमध्ये मात्र याची मोठी चर्चा सुरू आहे.
