खतांची लिंकिंग व भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश; फलटण तालुक्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी.
। लोकजागर । फलटण । १३ मे २०२६ ।
फलटण पंचायत समितीच्या सभागृहात आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली. यावेळी आगामी खरीप हंगामातील पीक नियोजन, पीक विमा, पाणी व्यवस्थापन आणि खतांच्या उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी असण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांना कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या वाणांचे योग्य मार्गदर्शन करावे आणि सर्व कृषी केंद्रांमध्ये बियाणांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचना आमदार सचिन पाटील यांनी दिल्या.
शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवण्यासाठी आमदार पाटील यांनी कृषी विभागाला कठोर आदेश दिले आहेत. सध्या युरिया खतामध्ये होणारी भेसळ आणि सक्तीची लिंकिंग रोखण्यासाठी भरारी पथकांनी तत्काळ तपासणी करून निपक्षपातीपणे कारवाई करावी, असे त्यांनी बजावले. तसेच, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होणार नाही. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवताना कृषी विभागाकडून कोणतीही टाळाटाळ किंवा विलंब झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या बैठकीत आधुनिक तंत्रज्ञानावरही भर देण्यात आला. तालुक्यातील सासकल, गिरवी, धुमाळवाडी, निरगुडी आणि बोडकेवाडी या पाच गावांमध्ये ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, त्याचा विस्तार इतर गावांमध्येही करण्याचे नियोजन आहे. तसेच औषध फवारणीसाठी ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल, असेही पाटील यांनी नमूद केले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे निरा देवघर आणि धोम-बलकवाडीचे पाणी लवकरच तालुक्यात पोहोचणार असून, संपूर्ण तालुका ओलिताखाली येणार असल्याने कृषी विभागाने आता अधिक कार्यक्षमतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, उपविभागीय कृषी अधिकारी मोमीन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह सर्व मंडल कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक उपस्थित होते.
