आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गौरव; प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. चौधरी दूरस्थ प्रणालीद्वारे सोहळ्यात सामील.
। लोकजागर । फलटण । २१ मे २०२६ ।
श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटणच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा सन २०२५-२६ चा २९ वा ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार’ प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर झाला. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार श्रीमंत मालोजीराजे स्मृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पिंपरी चिंचवड सहकारी बँकेचे आणि बाळासाहेब देवरस रुग्णालय (पुणे) चे अध्यक्ष शिरीष देशपांडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. चौधरी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या वतीने प्राज इंडस्ट्रीजचे वरिष्ठ व्यवस्थापक अक्षय खोपडे व पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या सोहळ्याला माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, बँकेच्या उपाध्यक्ष योगिता पोकळे, व्यवस्थापक राजेश लढ्ढा, जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर आणि पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी १९९५ पासून या महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले. तसेच बँकेची आर्थिक स्थिती सुदृढ असून बँक नफ्यात आल्याची माहिती देत त्यांनी सभासद व ठेवीदारांचे आभार मानले.
दूरस्थ (ऑनलाईन) प्रणालीद्वारे मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रमोद चौधरी यांनी फलटणशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित केले. साखरवाडी व फलटण येथील साखर उद्योगामुळे त्यांचे कुटुंब काही काळ फलटणमध्ये वास्तव्यास होते. येथील मुधोजी हायस्कूलमधील शिक्षण आणि सामाजिक-सांस्कृतिक वातावरणामुळेच आपल्या आयुष्याला दिशा मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जगभरात अनेक पुरस्कार मिळाले असले, तरी हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे, असे भावोद्गार त्यांनी काढले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य विश्वासराव देशमुख लिखित ‘मुधोजीराजे’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले.
आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत मालोजीराजेंनी दिलेल्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक मूल्यांचा उल्लेख करत, ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात शिरीष देशपांडे यांनी बँकिंग क्षेत्रातील आव्हानांचा आढावा घेत बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले. १४ ते २५ मे दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचा शुभारंभही यावेळी झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक शिंदे व प्रा. नीलम देशमुख यांनी केले, तर प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी आभार मानले.
