पालखी आगमनापूर्वी शहरातील रस्ते व विकासकामे तातडीने पूर्ण करा; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कडक निर्देश

पालखी सोहळा संपेपर्यंत नवीन रस्ते खोदण्यास सक्त मनाई; कामे निकृष्ट झाल्यास कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा.

। लोकजागर । फलटण । २१ मे २०२६ ।

आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी फलटण नगरपरिषदेत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत, पालखी मार्गावरील सर्व प्रलंबित कामे वेळेत आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे सक्त निर्देश संबंधित प्रशासन आणि कंत्राटदारांना देण्यात आले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, नगर अभियंता आर. डी. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे, नगरसेवक रोहित नागटिळे, राहुल निंबाळकर, माजी नगरसेवक अनुप शहा तसेच कंत्राटदार प्रतिनिधी पाटील आणि विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान नगराध्यक्षांनी पालखी मार्गावर सुरू असलेल्या रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज वाहिनीच्या कामांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली व कंत्राटदारांना कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या.

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आदेश दिले की, पालखी आगमनापूर्वी शहरातील जेवढे रस्ते विविध कामांसाठी उखडण्यात आले आहेत, ते सर्व रस्ते तातडीने पूर्ववत करून वाहतुकीसाठी खुले करण्यात यावेत. तसेच, पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत शहरात कोणत्याही कारणासाठी नवीन रस्ते खोदू नयेत, अशा स्पष्ट आणि कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. लाखो वारकरी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्या व्यवस्थित आणि सुरक्षितरीत्या मुरूम टाकून भरून घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

रस्त्यांची कामे सुरू असताना शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा किंवा इतर पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडतात, अशा वेळी नगरपालिका प्रशासन आणि कंत्राटदारांनी आपापसातील समन्वयातून ही गळती त्वरित दुरुस्त करावी, जेणेकरून नागरिकांना पाण्यासाठी ताटकळावे लागणार नाही, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. सध्या सुरू असलेल्या ड्रेनेज आणि पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामांना प्राधान्य देऊन ती जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. तसेच, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या या महत्त्वपूर्ण विकासकामांमध्ये कोणी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत असल्यास, अशा व्यक्तींवर नगरपरिषदेच्या वतीने कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी दिला आहे.

Spread the love